इंदूर (वृत्तसंस्था) : फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या इंदूरच्या खेळपट्टीवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जमवण्यात अपयशी ठरलेला कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने अर्धशतकीय खेळी खेळत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात १६३ धावा जमवत कांगारूंसमोर विजयासाठी ७६ धावांचे छोटे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्य छोटे असले, तरी खेळपट्टीचा अंदाज घेता तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कसोटी लागणार असल्याचे दिसते. नॅथन लायनच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यातील टीम इंडियाचा दुसरा डावही विशेष ठरला नाही.
गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची घसरगुंडी झाले. चेतेश्वर पुजारा वगळता भारताचा एकही फलंदाज मैदानात तळ ठोकू शकला नाही. पुजारा वगळता भारताचे अन्य फलंदाज लायनच्या सापळ्यात सहज अडकले. पुजाराने १४२ चेंडूंचा सामना करत ऑसींच्या गोलंदाजांना आपल्या विकेटसाठी रडवले. त्याने भारताकडून एकाकी झुंज देत ५९ धावा जमवत भारताला कसाबसा दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. श्रेयस अय्यरने २६ धावा करत त्यातल्या त्यात बरी साथ दिली. भारताच्या अन्य फलंदाजांनी मात्र निराश केले. त्यामुळे भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर सर्वबाद झाला. ऑसींच्या लायनची जादू गुरुवारीही चालली. त्याने एक दोन नव्हे, तर भारताच्या ८ फलंदाजांना माघारी धाडले. सेट झालेल्या पुजाराचाही अडथळा लायननेच दूर केला. मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाची सुरुवात १५६ धावांवर ४ बाद अशी करणाऱ्या ऑस्ट्रेलियालासाठी पहिले सत्र धोकादायक ठरले. सुरुवात चांगली करूनही त्यांना पहिल्या डावात दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताच्या रविंद्र जडेजाने ४, तर रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी ३ विकेट मिळवले.