मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याने चाहते भावूक झाले. मात्र, आता हे दुःख मागे सारून भारतीय क्रिकेट एका नव्या उमेदीने २०२६ मध्ये पाऊल ठेवत आहे. नवोदित खेळाडूंच्या खांद्यावर असलेली धुरा आणि 'मिशन वर्ल्ड कप' यामुळे २०२६ हे वर्ष भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे.
मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकर हे चितेंत पडलेले परंतु, ...
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर वर्षाची सुरुवात
टीम इंडियाच्या २०२६ मधील मोहिमेची सुरुवात ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेने होणार आहे. यामध्ये ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांचा थरार पाहायला मिळेल.
वनडे मालिका : वडोदरा (११ जाने), राजकोट (१४ जाने) आणि इंदूर (१८ जाने) येथे सामने होतील.
टी-२० मालिका : २१ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान नागपूर, रायपूर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम अशा ५ शहरांमध्ये ही मालिका रंगणार आहे.
फेब्रुवारीत 'टी-२० वर्ल्ड कप'चा महासंग्राम
या वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा टी-२० वर्ल्ड कप. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध मुंबईत होणार आहे. मात्र, सर्वांचे लक्ष वेधले जाईल ते १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याकडे! ८ मार्चला या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार असून, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता पुन्हा एकदा विश्वविजेते बनण्याचे स्वप्न टीम इंडिया उराशी बाळगून असेल.
परदेश दौरे आणि ऐतिहासिक मालिका
वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ विश्रांती न घेता विविध देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे.
इंग्लंड दौरा (जुलै २६): २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. यात ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळले जातील. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर १९ जुलै रोजी शेवटचा वनडे सामना होईल.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान: ऑगस्टमध्ये भारत श्रीलंकेत २ कसोटी सामने खेळेल, तर जूनमध्ये अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
वर्षाचा शेवट: सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेचे संघ भारतात येतील, तर वर्षाअखेरीस टीम इंडिया पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाऊन कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवेल.
विराट-रोहितनंतरच्या या नव्या काळात यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋतूराज गायकवाड यांसारख्या तरुण तुर्कांकडे भारतीय क्रिकेटची धुरा असून, २०२६ हे वर्ष त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.






