मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मुख्य उपस्थितीत जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे गटाला सोबत घेऊन राज्यात सत्तेत आल्यानंतर रायगड जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगडातील अनेक नेते भाजपच्या रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. पाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि अलिबाग शेकापचे दिलीप भोईर अगोदरच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
सत्तासंघर्षानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाला. शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटात गेले. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दुभंगली गेली. सेनेतील फुटीचे प्रकरण न्यायालयात गेल्याने पक्षांतर्गत अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले. त्यामुळे सत्तेत असूनही शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ आटला आहे. मात्र त्याच वेळी देशात बलाढ्य असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या रायगड जिल्ह्यात वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सुधागड पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या गीता पालरेचा या कन्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पदाची धुराही त्यांनी यापुर्वी संभाळली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
अलिबाग तालुक्यातील शेकापचे चर्चेतील नेते दिलीप भोईर हे देखील भाजपमध्ये दाखल झालेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा सभापती पदाचाकार्यभार दोन वेळा त्यांनी सांभाळला आहे. मतदारसंघात नाविन्यपुर्ण उपक्रम राबिवण्यासाठी ते ओळखले जातात. गेली दोन वर्ष ते पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र शिवसेनेतील गटातटांची एकुण परिस्थिती पाहता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने अलिबाग विधानसभा मतदारसंघात प्रस्तापित चेहरा भाजपला मिळाला.
पेण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा कालपर्यंत जोरदार सुरु होती. मात्र त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत पेण विधानसभा मतदार संघातील ५०० हुन अधिक प्रमुख पदाधिका-यांनी प्रवेश केला आहे.
धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशाने शेकापचे पेण विधानसभा मतदारसंघातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पेण एकसंघी झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील पिढ्यान पिढ्या सुरू असलेले अनेक वाद मिटण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. शेकापची मुलूखमैदानी तोफ म्हणून या नेत्याची ओळख आहे. त्यामुळे भाजपचा रायगडमधील लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून या नेत्याकडे बघितले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि पेण विधानसभा मतदारसंघात भाजपने गेल्या काही वर्षात संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. विविध पक्षातील प्रस्तापित नेते पक्षात घेऊन स्वताची ताकद वाढवण्याचे धोरण भाजपने स्विकारले आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने अनेक ठिकाणी पक्षाला वाढण्याची संधी मिळत नव्हती. शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपकडे ही संधी आपोआप चालून आली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही पक्षाने सुरु केले आहेत.
एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटात जाण्यापेक्षा अनेक नेत्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होण्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाची सुरू असलेली न्यायालयीन लढाई सध्या भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…