बारावी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानात विद्यार्थ्यांची झाडाझडती!
मुंबई : राज्यभरात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अभियान राबवले जात आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी बैठे पथक, भरारी पथक परीक्षा केंद्रावर तैनात ठेवले आहे. शिक्षकांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची १०० टक्के तपासणी करुन, झाडाझडती करुनच त्यांना केंद्राच्या आत प्रवेश दिला जात आहे.
सकाळच्या सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरु झाली असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचे होते तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
पुस्तक, नोट्स, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या सुद्धा परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवल्या जात आहेत. बैठे पथकाकडून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. झेरॉक्स मशीन बंद ठेवण्यात आलेले आहे. स्टेशनरी दुकान विद्यार्थ्यांच्या गरजांपुरते सुरु ठेवण्यात आले आहे.
आजपासून (दि. २१ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी यंदा ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून गेल्या पाच वर्षांतील ही सर्वोच्च नोंद आहे.
दरम्यान, यंदाची परीक्षा प्रचलित पद्धतीने होणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच उच्चस्तरीय बैठक झाली. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आकलनासाठी दहा मिनिटे देण्याऐवजी परीक्षेच्या शेवटी दहा मिनिटे दिली जातील. सीबीएसईला वीस मिनिटे आधी दिली जातात. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे देण्यात आली. कॉपी रोखण्यासाठीच्या कृती कार्यक्रमासाठी विविध घटकांकडून २३८ सूचना प्राप्त झाल्या.
परीक्षा केंद्राच्या आत मध्ये जाण्याआधी शंभर टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची झाडाझडती घेतली जात आहे. त्यासाठी सुद्धा विशेष यंत्रणा परीक्षा केंद्रांवर सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाय कुठल्या प्रकारचा गोंधळ निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतरावरील झेरॉक्स दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत.
यादरम्यान, विभागीय मंडळ, जिल्हाधिकारी स्तरावर भरारी आणि बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर असेल. परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरातील छायाप्रतीची दुकाने बंद ठेवली जातील. तसेच सहाय्यक परीक्षकांचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग केले जात आहे. नव्या केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे.
उच्च शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप असला तरी बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. कोणाच्या प्रात्यक्षिक परीक्षा बाकी असल्यास २१ मार्चला लेखी परीक्षा संपल्यावर प्रात्यक्षिक परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे.