मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हायकमांडकडे सादर केला आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचे मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत.
सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी उघडपणे जाहीर झालेली होती. अशातच आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्तानंतर ही नाराजी अगदी टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील सावळ्यागोंधळाला प्रदेशाध्यक्ष कसे जबाबदार आहेत त्याचा नुकताच भांडाफोड नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी मीडियासमोर केला. त्यानंतर मौनव्रत धारण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट आघाडी उघडली असून काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवले आहे. या थोरातांच्या ‘लेटरबॉम्ब’ने काँग्रेसमध्ये मोठा ‘धमाका’ होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवले असून नाना पटोले यांच्या सोबत काम करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच पटोले यांच्या काँग्रेस पक्षातील आतापर्यंतच्या कामाचा आणि त्यामधून कसा घोळ झाला त्याचा सविस्तर उल्लेखही थोरात यांनी पत्रात केला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितली असतानाही शेवटपर्यंत घोळ घालून ही उमेदवारी सुधीर तांबे यांना देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या सत्यजीत तांबे यांनी बंड केले व अपक्ष निवडणूक लढवून जिंकली. सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्याने थोरात यातून तोडगा काढतील अशी अपेक्षा होती. मात्र, थोरात यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन धारण केले होते. परंतू निवडणूक संपल्यानंतर तांबे आणि पटोले गटात झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर थोरात सक्रिय झाले आहेत.
थोरात यांच्याशिवाय नाना पटोले यांच्यावर काँग्रेसमधील इतर आमदार व नेतेही नाराज आहेत. मागील एका निवडणुकीच्या वेळी पटोले यांनी आयत्या वेळी वेगळ्याच उमेदवाराला काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले होते. ऐनवेळी हा उमेदवार पळून गेल्याने पक्षाची नाचक्की झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाली. त्यासाठी पटोले हेच जबाबदार असल्याचे थोरात यांच्यासह अन्य काही नेत्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत पटोले यांच्या कार्यपद्धतीविषयी स्थानिक पातळीवर नाराजी होती. मात्र, आता थोरात यांच्यासारख्या नेत्यांनी ही नाराजी हायकमांडपर्यंत पोहोचवल्याने पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर गंडांतर येण्याची चिन्हं आहेत.
महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही पटोले यांचे सूर फारसे जुळत नाहीत. त्याचाही फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांड आता नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपमधून आलेल्या नाना पटोले यांना चार वर्षात आठ महत्त्वाची पदं का दिली गेली असा सवाल काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी विचारला आहे. राज्यात इतर नेत्यांमध्ये योग्यता नाही का? एकाच नेत्याचे एवढ्या वेळा लाड का पुरवले जातात? असे सवालही आशिष देशमुख यांनी उपस्थित केले आहेत. गावागावात रुजलेली काँग्रेस आणि त्यामध्ये नेतृत्वाची खाण असताना वारंवार एकच हिरा (नाना पटोले) बाहेर का निघतो? यामागचा काय राज आहे? हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना कळत असावे, असा टोलाही आशिष देशमुख यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ आणि समजूतदार नेत्याला त्रास देण्याचे काम नाना पटोले यांनी केले आहे, म्हणूनच थोरात यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे कठीण झालंय, असे मत व्यक्त केल्याचेही आशिष देशमुख म्हणाले.
देशमुख म्हणाले की, “सत्यजित तांबेंसारख्या तरुण तडफदार नेत्याला काँग्रेसपासून दूर करण्यात आलं. चांगल्या तरुण नेत्यांना काँग्रेसपासून दूर करण्याचं कामच नाना पटोले महाराष्ट्रात करत आहेत. सत्यजित तांबे यांच्यासोबत धोका झाला. त्यांचा छळ झाला. नाशिकच्या जागेसाठी नागपूर आणि औरंगाबादचे एबी फॉर्म पाठवण्याचं कारण काय होते?. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. शिवाय हंडोरे यांच्या पराभवासंदर्भातही चौकशी झाली पाहिजे. त्यासंबंधित रिपोर्ट अजूनही प्रलंबित आहे.”
नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकानंतर एक घोळ होत आहेत. भोंगळ कारभार सुरू आहे आणि त्यास विद्यमान प्रदेशाध्यक्ष कारणीभूत आहेत असा आरोप काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला. नाना पटोले यांच्या कारभारावर नेतेच नाही तर कार्यकर्तेही नाराज आहेत असून अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी नेतृत्व बदल अनिवार्य असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडीप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही निवडणुकीच्या माध्यमातून ठरावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस पक्षात नेहमी असे घोळ का होतात असा सवाल आशिष देशमुख यांनी विचारला आहे.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…