मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री फोनवरून संवाद साधल्याचे सांगितले जात आहे.
या चर्चेदरम्यान, महाराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणूकीबाबत सहकार्य करा अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. महाराष्ट्राच्या वाटेवर असलेला वेदांता-फॉक्सकॉन गुजरातच्या वाटेवर गेल्यानंतर शिंदे यांनी मोदींसोबत चर्चा केली. त्यामुळे आता या प्रकरणावर केंद्रातून सूत्र हलवली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित प्रकल्पावरून मोदी आणि शिंदेंमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचेही समजते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील, असे सांगण्यात आले होते. तसेच, तळेगावजवळील ११०० एकर जमीनही देण्यात आली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सबसिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
दरम्यान, रेल्वेमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. राज्यात नवीन उद्योग, प्रकल्प आणण्यासाठी पूर्ण क्षमता आहे आणि सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचा प्रयत्न करू, राज्यात नवीन उद्योग येण्यासाठी केंद्राचे सहकार्य आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रातील नेत्यांची भेटही घेणार आहे. राज्यात नवीन प्रकल्प आणण्याबाबत आमचे सरकार नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.