Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीगोव्यात काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये जाणार

गोव्यात काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये जाणार

पणजी : देशभरात काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा सुरू असताना दुसरीकडे गोव्यात मात्र भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदार आज भाजपात प्रवेश करणार असल्याचे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी हा दावा केला आहे.

गोव्यातील निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपमध्ये जात आहेत. काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ११ जागांवर विजय मिळाला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली होती. काँग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. भाजपात सामिल होणाऱ्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. दिगंबर कामत हे काँग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात.

जुलै महिन्यात गोव्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जुलै महिन्यातच काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. भाजप काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावेळी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावरून मायकल लोबो यांना हटवण्याची घोषणा केली होती. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची ऑफर दिली असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

दरम्यान, गोव्यातील काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याकाचा उपयोग फक्त विधानसभा निवडणुकीपूरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे मुश्किल असल्याने गोवा काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देण्यात आला असल्याची माहीती नजिर खान यांनी दिली आहे.

येणाऱ्या दोन महिन्यात काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला. त्यांच्या समवेत अल्पसंख्याक विभागाचे साजिद खान, एलविनो अरावजो, बर्नाद फर्नाडीसही उपस्थित होते.

राज्यातील जनतेने अकरा काँग्रेसचे आमदार निवडून दिले असतानाही पक्षातील आठ आमदार स्वार्थापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खुलासा खान यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचणार आहे. गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याने स्वार्थासाठी, या पक्षाचा फक्त आर्थिकरित्या उपयोग केला असल्याने केंद्रीय पदाधिकाऱ्यानी यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नजिर खान यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -