Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीकोकण रेल्वे मार्गावरील ‘डबल डेकर’ होणार इतिहासजमा

कोकण रेल्वे मार्गावरील ‘डबल डेकर’ होणार इतिहासजमा

मुंबई (प्रतिनिधी) : सात वर्षांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेसची ‘डबर डेकर’ही ओळख काळाच्या पडद्याआड जाणार आहे. या गाडीत वरती आणि खालती बसण्यासाठी केलेल्या विशिष्ठ व्यवस्थेमुळे ही गाडी आकर्षण बनली होती. आता द्वि साप्ताहिक आणि साप्ताहिक अशा चालणाऱ्या दोन डबल डेकरचे विलीनीकरण करण्यात येणार असून त्या ४ नोव्हेंबर २०२२ पासून नव्याने चालविण्यात येणार आहेत. मात्र डबल डेकर आसन व्यवस्था असलेला डबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून ही गाडी एक्स्प्रेस म्हणून धावणार असून यापुढे ‘डबल डेकर’ऐवजी ‘एक्स्प्रेस’ नावाने ती ओळखली जाणार आहे.

या गाडीला एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित डबा, एक द्वितीय वातानुकूलित डबा, आठ तृतीय वातानुकूलित, सहा शयनयान श्रेणीचे डबे, एक ब्रेक व्हॅनसह चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक पॅन्ट्रीकार जोडण्यात येणार आहे. या गाडीला वरची आणि खालची आसन व्यवस्था असलेला डबा जोडण्यात येणार नाही. या गाडीला सध्या आसन प्रकारातील तीन किंवा चार डबे जोडण्यात येतात. यापूर्वी या डब्यांची संख्या अधिक होती. ती हळूहळू कमी करून अन्य डबे जोडण्यात आले. या विलीनीकरणानंतर गाडी क्रमांक ११०८५ आणि ८६ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) उपलब्ध राहणार नाही.

कोकण रेल्वे मार्गावर २०१५ मध्ये पहिली वातानुकूलित डबल डेकर गाडी सुरू करण्यात आली होती. आसन प्रकारातील आठ डब्यांची लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळीदरम्यान धावणारी ट्रेन रेल्वे मडगावपर्यंत चालवण्यात येऊ लागली. आठवड्यातून तीन दिवस धावणारी डबल डेकर ट्रेन गणेशोत्सवात प्रथमच प्रीमियम म्हणून चालवण्यात आल्याने भाडे अवाच्या सवा वाढले आणि कोकण मार्गावरील प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली होती. त्यानंतर दिवाळीत नियमितपणे गाडी सुरू करतानाच प्रीमियम पद्धत हटवण्यात आली.

त्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला. आसन प्रकारातील डब्यांनाही गर्दीच्या वेळी चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु मुंबईतून गाडीची सुटण्याची वेळ, या गाडीच्या देखभाल-दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे प्रवाशांच्या वाढलेल्या तक्रारी आदी विविध कारणांमुळे गर्दीचा काळ वगळून इतर वेळी प्रवाशांनी या गाडीकडे पाठ फिरवली होती. नंतर मात्र प्रतिसाद वाढला. आता या गाडीचे विलीनीकरण करून ‘डबल डेकर’हे नाव संपुष्टात आणले आहे. मात्र याचे ठोस असे कारण मध्य रेल्वेकडून देण्यात आले नाही.

गाडी क्रमांक ११०८५ आणि ११०८६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस (द्वि-साप्ताहिक) आणि गाडी क्रमांक ११०९९ आणि १११०० लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेस (साप्ताहिक) यांचे विलिनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेमधील अधिकाऱ्यांनी दिली.गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ४ नोव्हेंबर २०२२ पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक १११०० ही गाडी ४ नोव्हेंबर २०२२ पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता पोहोचेल, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -