जीवनविद्येच्या ज्ञानाने अगणित लोक सुखी झालेत. ते का सुखी झाले? जीवनविद्येचे ज्ञान हे विचार इतके प्रभावी आहेत की, त्यातले थोडे विचार जरी तुम्ही आचरणात आणले तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. वटी लोक म्हणजे तरी कोण? त्या माणसांमध्ये ईश्वरच आहे ना. परमेश्वर सर्वांमध्ये आहे म्हणून त्याला सर्वेश्वर म्हणतात. परमेश्वराची जी अनेक नावे आहेत. त्यात हे सर्वेश्वर नाव अगदी उत्तम आहे. सर्वांमध्ये तो आहे, सर्व रूपाने तो आहे. बघा हे सर्वांमध्ये तो आहे, सर्व रूपाने तो आहे म्हणून सर्वेश्वर. कुणालाही सुखी करणे म्हणजे सर्वेश्वराला सुखी करणे व कुणालाही दुःखी करणे म्हणजे सर्वेश्वराला दुःखी करणे. तुकाराम महाराज म्हणतात “न घडो कुणाही भुताचा मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे”. तुकाराम महाराजांनी सर्वेश्वर हाच शब्द वापरला. परमेश्वराबद्दलचे ज्ञान जर लोकांना नसेल, तर ते सुखी कसे होणार? ज्ञानदानाचे महत्त्व अपरंपार आहे. आपण जीवनविद्येच्या ग्रंथातून हे परमेश्वराबद्दलचे ज्ञान लोकांना देतो. कुटुंबाचे ज्ञान देतो. बायकोचे महत्त्व किती आहे ते सांगतो. व्यवसाय कसा करायचा हे ही ज्ञान देतो. जीवनविद्या प्रपंचाच्या अंगाने व परमार्थाच्या अंगाने ज्ञान देते. हे एक जीवनविद्येचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की, ती दोन्ही गोष्टींचे ज्ञान लोकांना देते म्हणून लोक सुखी होतात. असे हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याची लाज कला वाटायला पाहिजे. आपण लोकांना सुखी करण्याचे काम करत आहोत, तर त्यात लाज बाळगण्याचे कारण नाही. ही पुस्तके घ्या. चांगली आहेत. या मार्गदर्शनाने तुम्ही सुखी व्हाल. तुम्हाला आवडली नाही, तर सुस्थितीत परत करा व तुमचे पैसे परत घ्या. आतापर्यंत एकानेही पुस्तके परत केलेली नाहीत. कारण लोकांना ती आवडतातच. सांगायचा मुद्दा परमेश्वर हा सर्वांमध्ये आहे व सर्व रूपाने आहे. काय सुंदर सांगितले आहे. “अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले”. डोके ठेवायला सांगितलेले नाही. चित्त ठेले म्हटलेले आहे. हे चित्त कुठे ठेवायचे? जगन्नाथाच्या चरणावर. जगन्नाथाचे चरण कुठले? सत् व चित्. सत् व चित् हे दोन जगन्नाथाचे खरे चरण आहेत. सत्, चित् व आनंद. सत् व चित् हे जगन्नाथाचे दोन चरण धरले की आनंद तुमच्या हातात येतो. “करतळी आवळे तैसा हरी”. सत् व चित् या जगन्नाथाच्या दोन चरणांवर चित्त ठेवायचे. हा जो परमेश्वर आहे तो सर्वेश्वर आहे. तो सर्वांमध्ये आहे व सर्व रूपाने आहे म्हणून आपल्या कक्षेत जे जे लोक येतात. त्यांना आपण सुखी करायचे.
– सदगुरू वामनराव पै