Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमहिलांनी स्वतःवर प्रेम करावे, स्वतःला स्वीकारावे

महिलांनी स्वतःवर प्रेम करावे, स्वतःला स्वीकारावे

मीनाक्षी जगदाळे

मागील काही लेखांतून आपण पाहिले की, महिलाच महिलांना अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे नाउमेद करतात, एकमेकींचे मानसिक खच्चीकरण करतात. हे थांबले पाहिजे, प्रत्येकीने स्वतःला बदलले पाहिजे, हे जरी खरं असलं तरी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेकजणी हा बदल अंगीकारतीलच, याची काही शाश्वती नाही. अशा प्रसंगांना तोंड देणे, तर आपल्याला चुकणार नाहीच म्हणून आयुष्यभर कोणाकडून किंवा कोणामुळे सतत डिस्टर्ब होत राहायचं का, कोणामुळे सतत आपली मानसिक स्थिती बिघडवून घेत राहायची का? तर नक्कीच नाही. यावर मात करायची असेल, तर प्रथम प्रत्येक स्त्रीने स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे.

आपण जशा आहोत, तशा स्वतःला पहिल्यांदा स्वीकारा. त्यामध्ये आपले रंग, रूप, उंची, जाडी, बांधा, व्यक्तिमत्त्व, शिक्षण, आपल्या चांगल्या-वाईट सवयी, गुण-अवगुण, कला-कौशल्य आपली बुद्धिमत्ता, गुणवत्ता सगळं काही जसंच्या तसं मोकळ्या मनाने स्वीकारा. आपल्यातील कमतरता दूर करण्याचा जरूर प्रयत्न करा. पण जमत नसेल, तसं होत नसेल, तर स्वतःला इतरांच्या बोलण्यावरून त्रास करून घेऊ नका. कोणी आपल्याला सतत डिवचत असेल, आपल्याला स्वतःच्या मनातून, स्वतःच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्यातून स्वतःला सावरा आणि हिमतीने आहे त्या आयुष्याला सामोरे जा. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या महिलांना कायमस्वरूपी डिप्रेशनमध्ये नेऊ शकतात.

खूप किरकोळ कमतरता अथवा उणिवा असतात. पण त्याचा खूप मोठा बाऊ आपल्याच आजूबाजूचे लोक करतात आणि आपण उद्ध्वस्त होत जातोय. आपण चारचौघांत रडलो, भांडलो, रागावलो तरी त्याच भांडवल केलं जातं. लोकांना हेच हवं असतं की, आपण मानसिक दृष्टीने कमकुवत व्हावे, त्यांनी आपल्या खचलेल्या मानसिकतेचा फायदा घ्यावा, त्यांनी आपल्या वीक पॉइंट्सवर चर्चा करावी आणि आपल्यावर अजून चुकीचे प्रसंग यावेत. खूप कमी नातेवाईक, खूप कमी मैत्रिणी अशा असतात, ज्या खरंच जीवाभावाच्या असतात. त्यामुळे आपले मन योग्य वेळी योग्य व्यक्तीजवळच मोकळे करणे महिलांना जमले पाहिजे. आपण समजतो तितक्या सोप्या, सरळ सगळ्याच नसतात.

आपल्याचकडून आपली माहिती, आपल्या समस्या, आपली दुःख रडून काढून घेऊन त्याची प्रसिद्धी हसून करणाऱ्या कुटुंबातील अथवा बाहेरील परिचित महिलांपासून सावध राहणे रास्त असते. आपल्यातला आत्मविश्वास सदैव जागृत ठेऊन, मनावर प्रचंड ताबा ठेऊन, भावनांना आवर घालून महिलांनी वावरणे हितावह आहे. आपल्या मनाचा थांग सहजासहजी कोणाला लागणार नाही, इतपत हुशारी आपल्यात असणे अभिप्रेत आहे. यासाठी महिलांना स्वतःला खूप आत्मनिर्भर बनवणे आवश्यक आहे. आपण स्वतःवर प्रेम केलं, आपण स्वतःला शिस्तीने सांभाळलं, तर कोणीही सहजासहजी आपल्या वाट्याला जाणार नाही.

आपणदेखील कोणाचीही चुकीच्या वागणुकीत, चुकीच्या चर्चेत अथवा निर्णयात, चुकीच्या गोष्टीत साथ देऊ नये म्हणजे आपल्यापर्यंत कोणतीही चुकीची गोष्ट येणार नाही. आपण जे पेरू तेच उगवणार आहे, त्यामुळे आपणसुद्धा विचारपूर्वक वागून इतरांनाही त्यांनी मागितल्यास चांगलेच सल्ले देण्यासाठी बांधील असावे. अनेकदा आपल्याला सातत्याने दोष देऊन, आपल्या चुका दाखवून, आपल्याला परत परत आपल्या चुकीच्या निर्णयामुळे कसं नुकसान झालं, याचा उल्लेख करून आपल्याला स्वतःला सतत अपराधी वाटावे, यासाठी आपल्याजवळील, नात्यातील महिला प्रयत्न करीत असतात. आपण सतत अपराधी भावनेने जगावे, खूप मोठा गुन्हा केल्यासारखं आपल्याला वाटतं राहावं आणि आपण सतत दबून राहावं, हा त्यामागील उद्देश असतो.

जरी आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाची चूक झालेली असेल, तरी त्यावर सावरासावर करत बसण्यापेक्षा, खोटं बोलून ते लपवण्यापेक्षा कबूल करून टाकणे आणि स्वतःच्या मनावरचं ओझं हलकं करणे सर्वोत्तम पर्याय आहे. त्यानंतरही आपल्याला वारंवार त्याच मुद्द्यावरून दुखावले जात असल्यास स्पष्ट शब्दांत समोरील व्यक्तीला योग्य ते उत्तर देऊन मोकळे होणे आपल्या मनःशांतीसाठी आवश्यक आहे. आपल्यामध्ये हा सच्चेपणा, ही पारदर्शकता तेव्हाच येईल, जेव्हा आपण स्वतःला स्वीकारलेलं असेल.

स्वतःपासून, स्वतःच्या परिस्थितीपासून आपण पळतो, स्वतःभोवती आभासी जग तयार करून आपण जगतो. अनेक बाबतीत आपण कळून न कळल्यासारखं, समजून न समजल्यासारखं वागतोय आणि त्यामुळेच लोकांना आपल्याला दुखावण्याची संधी वारंवार मिळत राहाते. आपण स्वतःला, स्वतःबद्दल जे दाखवतो, तितकंच लोकांना दिसत नसते, तर त्याही पलीकडे लोकांचा अभ्यास आपल्याबाबतीत असतो. ज्या-ज्या वेळी आपण खोटं अथवा कृत्रिम वागतोय, सत्य लपवतोय हे इतरांच्या लक्षात येतं, तेव्हा तेव्हा आपल्याला अधिक चिडवून देण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून आपला उद्वेग, आपला राग, संताप, त्रास यांतून त्यांना आपल्यातील, आपल्या आयुष्यातील सर्वच चित्र स्पष्ट दिसावे. त्यामुळे जे आहे ते तसेच असू द्या, दिसू द्या. स्वतःवर दबाव ठेवून जगू नका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -