कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवलीत कासव तस्करीत वाढ झाली असून वन विभागाने दोन दुकानांवर छापा मारत ७ कासव जप्त केले आहेत. कल्याण पश्चिम परिसरात संजय गजधाने यांच्या पाळीव प्राण्याच्या दुकानावर धाड मारून ३ इंडियन टेंट टर्टल प्रजातीच्या कासव, तर कल्याण पूर्वेत अजय शर्मा यांच्या दुकानावर धाड मारून ४ भारतीय स्टार कासवांची सुटका केली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून कासव खरेदी विक्रीच्या घटना वाढल्याने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कासवाची तस्करी केली जात आहे. कासवाला जास्त मागणी असल्याने दुकानदार मोठ्या प्रमाणात कासव ठेवून विक्री करत आहेत. अशा दुकानदारांच्या विरोधात कल्याण वन विभागाने कंबर कसली असून या दुकांदारावर छापे मारत कारवाई सुरू केली आहे. वनविभागाने नुकत्याच दोन कारवाईत सात कासव जप्त करण्यात आले आहे.
यात कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या संजय गजधाने ह्यांच्या पाळीव प्राण्याच्या दुकानावर धाड मारून ३ इंडियन टेंट टर्टल प्रजातीच्या कासवांची, तर कल्याण पूर्वेत अजय शर्मा यांच्या दुकानावर धाड मारून ४ भारतीय स्टार कासवांची सुटका करत दोन्ही दुकान चालकाच्या विरोधात वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कासव खरेदी करणे गुन्हा असून अशा प्रकारे कुठल्याही प्राण्याची खरेदी विक्री करू नये, असे आवाहन वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने यांनी केले आहे.