Tuesday, April 29, 2025

महामुंबई

नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार

नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या देशाला अपार क्षमता असलेल्या अत्यंत सुंदर अशा नद्या लाभल्या आहेत, या नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत असे, केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

केंद्र सरकारचे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय आणि फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ यांनी संयुक्तपणे मुंबईत आयोजित केलेल्या अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेत आजच्या दुसऱ्या दिवशी' नद्यांमधील क्रूझ सेवेची क्षमता' या विषयावरील सत्रात ते रविवारी बोलत होते.

भारतात मोठी क्षमता असून त्याला आता तरुणाईच्या क्षमतेची जोड मिळाली आहे याचा उपयोग करत विविध विभागांना संलग्न करून पर्यटनासाठी गतीशक्तीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. संपूर्ण देशांतर्गत जलमार्गांमधील क्रूझ सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने नदी क्रूझ सेवेसाठी मार्गदर्शक कृती आराखडा करण्याचे आणि गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केले. नदीमधील क्रूझ सेवेचा अनुभव आजूबाजूला असलेल्या निसर्गाची अनुभूती देईल असे ते म्हणाले.

गेल्या सहा महिन्यांत भारतात देशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांबरोबरच देशांतर्गत पर्यटकांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून देशाचे आगामी सर्वंकष राष्ट्रीय पर्यटन धोरण सर्व भागधारकांना सामावून घेत या क्षेत्रातील चांगल्या समन्वित विकासाचा मार्ग मोकळा करेल, असे रेड्डी यांनी सांगितले.

समुद्रकिनारा पर्यटन, द्विपगृह पर्यटन आणि क्रूझ पर्यटन यांद्वारे देशातील नदी आणि सागरी किनारी पर्यटनाला चालना दिल्याने मच्छीमार समुदायांना उपजीविकेच्या अन्य पूरक संधी उपलब्ध होतील असेही रेड्डी म्हणाले.

Comments
Add Comment