बोईसर ( वार्ताहर) : पालघर पूर्वेकडील फिया ओरियन या इमारतीचे सांडपाणी व शौचालयाचे पाणी गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्यावर येत असल्याने तेथून येणाऱ्यांना व आजूबाजूच्या इमारतींना त्याचा त्रास होत असून विकासक व नगर परिषदेकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
नगर परिषद कार्यक्षेत्रातील रामनगरजवळ फिया ओरियन ही इमारत असून या इमारतीचे सांडपाणी व शौचालयाचे पाणी अनेक महिन्यांपासून रस्त्यावरून वाहत आहे. याविषयी विकासकाकडे वेळोवेळी तक्रार करूनही विकासक लक्ष देत नाही.
गटार नसल्यामुळे पाणी आम्ही कुठे सोडणार असे त्यांचे म्हणणे आहे. कोणाला काय तक्रार करायची ती करा, असेही ते म्हणतात. बाकीच्या आजूबाजूच्या सोसायटींनीसुद्धा आपल्या इमारतीची तक्रार केली आहे. त्यावर विकासकाचे म्हणणे आहे, करू दे ना तक्रार, त्यांचं ते बघतील.
पर्याय नसल्यामुळे मी काहीच करू शकत नाही, असे उत्तर विकासक देत असल्याचे म्हणणे सोसायटीचे सचिव सागर इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुमारे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा नगर परिषदेकडे तक्रार करूनही नगर परिषद व स्थानिक नगरसेवक या महत्त्वाच्या प्रश्नाकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात? शौचालयाच्या व सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून तेथून जाताना-येताना नाकावर रुमाल घेऊन जावे लागत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
या घाण पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेस पत्र देऊन एक महिना होऊनसुद्धा तेही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या विषयाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.