संतोष रांजणकर
मुरूड : पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशीद-बिच समुद्र किनाऱ्यावर रविवारी पर्यटकांची मांदियाळी दिसून आल्याने येथील पर्यटन बहरून आल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने येथील पर्यटनावर परिणाम झाला होता. कोरोना कहर ओसरल्यावर शासनाने निर्बंध हटविण्यात आल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले मात्र मागील आठवड्यापासून तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात उष्णतेमुळे, हवामानातील बदलांमुळे पर्यटकांनी घरीच बसणे पसंत केले होते.
एप्रिल महिन्यात हवामानातील बदलामुळे दोन वेळा उष्णतेच्या लाटेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली होती. २५ एप्रिलनंतर मुरूडमधील हवामानातील उष्णता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मुरूडचे तापमान ५° अंशाने कमी झाल्यामुळे मुरूडकरांना व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणून मुरूडच्या दिशेने पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे पर्यटकांचे मुरूडमधील सर्वात आवडते ठिकाण काशिद-बीचवर पर्यटकांची मोठी भरती आली आहे. काशिद-बीचवरील शुभ्र वाळू व सुरुची बने पर्यटकांना आकर्षित करतात.
मुंबईपासून सुमारे १३५ किमी व पुण्यापासून सुमारे १८० किमी अंतरावर असलेल्या काशिद-बिचला पर्यटक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा येण्यास सुरुवात झाली आहे. मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला, दत्त मंदिर, गारंबी, फणसाड अभयारण्य या ठिकाणांना पर्यटक आवर्जून भेट देतात. आता कुठे मुरूडला पर्यटक येऊ लागले असल्याने पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे.
काशीद-बिच रस्त्यावर आज दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरला असल्याचे व त्यामुळे पर्यटन व्यवसायाला उभारी मिळाली असल्याचे चित्र दिसून आले.