Sunday, May 18, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांची धावाधाव!

राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांची धावाधाव!

मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचे चॅलेंज दिल्यानंतर आता राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांची धावाधाव सुरु आहे.


मुंबईत आलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी आज सकाळपासूनच शिवसैनिकांनी मुंबईत 'फिल्डिंग' लावायला सुरुवात केली होती. सुरुवातीला राणा दाम्पत्य विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी आज पहाटेपासूनच शिवसैनिक सीएसएमटी स्थानकावर ठाण मांडून बसले होते. मात्र, राणा दाम्पत्य या ट्रेनने आलेच नाहीत.



त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा मुंबईत विमानाने दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईत आल्यानंतर विमानतळाशेजारीच असणाऱ्या नंदगिरी गेस्टहाऊसवर त्यांचा मुक्काम असेल. त्यासाठी राणा दाम्पत्याकडून गेस्ट हाऊसमध्ये बुकिंगही करण्यात आले होते. ही माहिती कळाल्यानंतर शिवसेनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा नंदगिरी गेस्ट हाऊसकडे वळवला. सध्या शिवसैनिकांनी नंदगिरी गेस्ट हाऊसला घेराव घातला आहे. याठिकाणी शिवसैनिकांकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. याठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य या गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाले तरी उद्या येथून ते मातोश्रीच्या दिशेने बाहेर कसे पडणार, हा प्रश्नच आहे.


नवनीत राणा यांना अडविण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबईच्या टोल नाक्यांवर देखील फिल्डिंग लावली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनीत राणा यांना मुंबईत प्रवेश करू द्यायचा नाही असा चंगच शिवसैनिकांनी बांधला होता. दरम्यान, मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावरही शिवसैनिक जमा झाले होते. परंतु नवनीत राणा या मुंबईत दाखल झाल्याचं कळताच शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि या शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठले आहे.


राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी सगळीकडे धावाधाव सुरु असलेल्या या शिवसैनिकांना चकमा देत राणा दाम्पत्य त्यांच्या खार येथील निवासस्थानी पोहचले. याची माहिती मिळताच काही शिवसैनिक खार येथेही पोहचले असून ते राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत.


तर दुसरीकडे राणा दाम्पत्य गनिमी काव्याचा वापर करून ऐनवेळी मातोश्रीवर येऊ शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन शिवसैनिक सावध झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच मातोश्री परिसरात शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. याठिकाणी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणावर जमल्या असून सर्वजण येथे ठाण मांडून बसले असल्यामुळे राणा दाम्पत्य याठिकाणी आले तरी त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही, हा शिवसैनिकांचा प्रयत्न असेल. या सगळ्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Comments
Add Comment