मुंबई: युनियन कॅबिनेट मंत्रालयाने झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील १९१४२ कोटींच्या सहापदरी ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला मान्यता दिली आहे. नाशिक- सोलापूर- अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने महाराष्ट्रातील या विशाल प्रकल्पाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. १९१४२ कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पात नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर अशा महत्वाच्या शहरांना सहजपणे कनेक्टिव्हिटी वाढवणे शक्य होणार आहे. माहितीनुसार या प्रकल्पामुळे तब्बल प्रवासाचे १७ तास वाचणे प्रवाशांना शक्य होईल. पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत मिळालेल्या या मंजुरीमुळे नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव या जिल्ह्यातील पायाभूत सुविधेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे. या रस्त्यामुळे बदललेल्या कनेक्टिव्हिटीसह या शहरांचा कायापालट होणे शक्य होईल.
६ पदरी असलेल्या या महामार्गावर ६० किलोमीटर सरासरी वेग मर्यादा वाहनांना मिळू शकते तर एकूण डिझाईन वेग १०० किलोमीटर प्रति तास असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रस्तावित प्रकल्पात १७ तासांचा प्रवास वाचणे प्रवाशांना शक्य होणार आहे. नियामकांच्या मते, ३१ तासातील ४५% प्रवास वाचेल. सरकारच्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे २५१.०६ लाख पातळीवर रोजगार निर्मितीची व अप्रत्यक्षपणे ३१३.८३ लाखांची रोजगार निर्मिती शक्य होणार आहे. महाराष्ट्रातून जात असलेल्या या प्रकल्पातून पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जोडले जाईल. हा प्रकल्प नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव या जिल्ह्यातून जाणार आहे. बीओटी (Build Operate Transfer) प्रणालीतून हा प्रकल्प उभा राहिल अशी प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. यामध्ये खाजगी गुंतवणूक देखील असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, नवीन महामार्ग बांधण्याचा आणि विद्यमान महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल. मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १९१४२ कोटी रुपये एकूण भांडवली खर्चासह सहा-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली. एका अधिकृत निवेदनानुसार, 'हा ३७४ किलोमीटर लांबीचा प्रकल्प बीओटी (टोल) पद्धतीने बांधला जाईल. हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना जोडेल आणि पुढे कुर्नूलपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, असे त्यात म्हटले आहे. ही पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे' असेही त्यात नमूद केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक आणि सोलापूर दरम्यान नवीन सहा-पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला आणि ओडिशामधील NH-326 च्या रुंदीकरण व बळकटीकरणाला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधानांनी एक्स'वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की,'विकासासाठी पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांचे निर्माण.' पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की,'मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील ६-पदरी नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी संरेखित असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम ते पूर्व कनेक्टिव्हिटी मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल, ज्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल.'






