मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्रे गेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. परभणी, वर्धा, नांदेड, पुणे येथील भाजप, वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
आज लोक हळुहळू या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तर प्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तर प्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज एक दिवस असा जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे, असेही ते म्हणाले.