Sunday, May 11, 2025

मनोरंजनसिंधुदुर्ग

सिंधुकन्या दिक्षा नाईकला मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

सिंधुकन्या दिक्षा नाईकला मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

सिंधुदुर्ग : स्नेहांश एन्टरटेन्मेंट प्रस्तुत शेखर गवस दिग्दर्शित झुल्बी या शॉर्टफिल्ममधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची कन्या कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिची मुंबई एन्टरटेन्मेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते दिक्षाला बेस्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. या फेस्टिवलमध्ये भारत देशासोबतच युनायटेड किंग्डम, हाँगकाँग, स्पेन, फ्रान्स, जपान, स्वित्झर्लंड, कॅनडा, बांगलादेश, ब्राझील, ओमान, चीन अशा देशांसह जगभरातून ३५० शॉर्टफिल्मचा सहभाग होता. त्यामुळे या पुरस्कारास विशेष महत्व आहे.


मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), (व्हाईस प्रेसिडेंट इंडियन फिल्म फेडरेशन), बाळासाहेब गोरे (अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्मिता महामंडळ अध्यक्ष), दिलीप दळवी (सरचिटणीस, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन), राजू शेवाळे (खजिनदार, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ), दिग्दर्शक योगेश पाटील, शाहीर सचिन जाधव, दिग्दर्शक प्रदिप खामगळ, उद्योजक अमित कांगणे, अभिनेत्री पूनम, ॲड, नितीन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.


अभिनयामध्ये सिंधुदुर्गचा झेंडा अटकेपार फडकवणारी कु. दिक्षा प्रमोद नाईक ही मालवण तालुक्यातील गोळवण गावची असून सध्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे राहत असून कुडाळ हायस्कूल कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. यापूर्वीही "झुल्बी" या लघुपटातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल दिक्षाला राज्यस्तरीय स्पर्धेत बेस्ट ॲक्टर म्हणून गौरवण्यात आले आहे. दिक्षाच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


सिंधुदुर्गात चित्रीकरण झालेली शेखर गवस दिग्दर्शित आणि रामचंद्र कुबल लिखित "झुल्बी" ही शॉर्टफिल्म रसिकांच्या मनाला हेलावून टाकणारी आहे. या मध्ये कु. दिक्षा नाईक हिने दमदार अभिनय करून आपल्या सिंधुदुर्गची शान वाढवली आहे. तिच्यासोबत तिचा सहकलाकार कु. वेदांत वेंगुर्लेकर, दिग्दर्शक शेखर गवस, उमेश वेंगुर्लेकर, रवि कुडाळकर, रामचंद्र कुबल, शेखर सातोस्कर, सत्येंद्र जाधव, सिद्धेश खटावकर, शरद सावंत, सुशील डवर, प्रमोद तांबे, प्रणाली गावक, अजय कुडाळकर, चेतन पवार, सौरभ तांबे त्याचप्रमाणे स्नेहांश एन्टरटेन्मेंटच्या पूर्ण टीमचे मोलाचे योगदान तिला लाभले आहे.

Comments
Add Comment