Tuesday, November 5, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियासमोर द. आफ्रिकेचे आव्हान

ऑस्ट्रेलियासमोर द. आफ्रिकेचे आव्हान

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपची सुपर १२ फेरी आजपासून

अबुधाबी (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. या फेरीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. या फॉरमॅटमधील जगज्जेतेपदाची प्रतीक्षा असलेले संघ तुल्यबळ असल्याने ओपनिंग लढतीची उत्सुकता वाढली आहे.

जेतेपद दूरच

सलामीला समोरासमोर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे दुर्देव म्हणजे दोन्ही संघांना टी-ट्वेन्टी वर्ल्डकप ट्रॉफी उंचवता आलेली नाही. तिसऱ्या स्पर्धेत (२०१०) उपविजेतेपद ही कांगारूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्यावेळी फायनलमध्ये इंग्लंडकडून मात खावी लागली. बाद फेरीत ढेपाळणारा संघ (चोकर्स) अशी ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला आजवरच्या सहा स्पर्धांत सेमीफायनलपर्यंतच (२००९, २०१४) मजल मारता आली आहे. २०१६मध्ये भारतात झालेल्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांचे आव्हान सुपर टेन फेरीतच संपले.

कांगारूंचे वर्चस्व

उभय संघ आजवर २१वेळा आमनेसामने आलेत. त्यात ऑस्ट्रेलियाने १३-८ अशी मोठी आघाडी घेतली आहे. मागील पाच टी-ट्वेन्टी सामन्यांचा निकाल पाहता कांगारूंनी प्रतिस्पर्ध्यांवर ३-२ असे वर्चस्व राखले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये द. आफ्रिकेत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तीन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांनी यजमानांवर २-१ अशी मात केली होती. विश्वचषकापूर्वीचे दोन्ही सराव सामने जिंकताना द. आफ्रिकेने सर्वच क्रिकेटपटूंची चाचपणी केली. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवले तरी माजी विजेत्या भारताविरुद्ध डाळ शिजली नाही.

वॉर्नरचा बॅडपॅच चिंताजनक

ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची भिस्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह कर्णधार आरोन फिंच, माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिसवर आहे. स्मिथने प्रॅक्टिस मॅचमध्ये चांगला सराव केला. मॅक्सवेलने आयपीएलमध्ये चमक दाखवली आहे. संघनायक फिंचने अनुभवींवर विश्वास दाखवला असला तरी वॉर्नरचा बॅडपॅच त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. गोलंदाजीमध्ये कांगारूंची मदार मिचेल स्टार्कसह पॅट कमिन्सवर आहे.

डी कॉक, नॉर्टजेवर मदार

क्विंटन डी कॉकचा आयपीएलमधील फॉर्म पाहता दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी मजबूत वाटते. त्यांच्याकडे आयडन मर्करम, डेव्हिड मिलर, कर्णधार टेंबा बवुमा असे झटपट प्रकाराला अनुकूल बॅटर आहेत. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज अॅन्रिच नॉर्टजे हा आयपीएलमधील सातत्य राखेल, असा संघ व्यवस्थापनाला विश्वास आहे. कॅगिसो रबाडा, लुन्गी एन्गिडी, तबरेझ शम्सीकडून संघाला खूप अपेक्षा आहेत.

आजचे सामने

ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका

वेळ : दु. ३.३० वा.

इंग्लंड वि. वेस्ट इंडिज

वेळ : सायं. ७.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -