मुंबई : पाकिस्तानने पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्या, नाही तर पाकसोबत एकदा आरपारची लढाई करावी लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.
हे सुद्धा वाचा – भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला
‘भारताच्या जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा डाव आहे. अनेक भारतीय व्यवसाय करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये जातात. परंतु दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्यांना मारले जात आहे. पाकिस्तानने हल्ले थांबविले नाही तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. पाकने दहशतवादी कारवाई थांबवून पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात दिला पाहिजे अन्यथा पाकसोबत आरपारची लढाई करावी लागेल. पाकिस्तानचे फार लाड करून चालणार नाही,’ असे रामदास आठवले म्हणाले.
भारत-पाक क्रिकेट सामन्याला आठवल्यांचा विरोध
‘भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्यात यावा. पाकिस्तान भारतावर अनेक हल्ले करत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये परंतु अशा परिस्थितीत भारत पाकिस्तान सामने न होणे योग्य आहे. त्यामुळे मी जय शहा यांना सांगेल की, पाकिस्तान संघासोबत खेळू नये,’ असेही आठवले म्हणाले.