सेल्फी : चंद्रकांत बर्वे
देशाचे खरे खरे हिरो कोण? तर ते म्हणजे मोठं संशोधन करणारे वैज्ञानिक, देशाच्या संरक्षणात आयुष्य घालवणारे जवान, जगाला नेतृत्व देणारे नेते, देशाचं जागतिक पातळीवर नाव उंचावणारे खेळाडू, कलाकार, कारखानदार आदी असतात! पण ही सत्य परिस्थिती कोणी लोकांपर्यंत चांगली पोहोचवली नाही, त्यामुळे फिल्मी हिरोच सध्या रोल मॉडेल झालेयत.
फिल्मी लोक हे खरे हिरो नाहीत, हे फक्त उत्तम अभिनय किंवा नक्कल करू शकणारे कलाकार आहेत ही गोष्ट मात्र समाजमनावर कोणी पुरेशी बिंबवलेली नाही. बॉलिवूड आणि व्यसने यांचा नातेसंबंध अगदी जुना आहे. मीनाकुमारीसारखी ग्रेट अभिनेत्रीदेखील दारूच्या व्यसनात होती. पण त्या काळात व्यसनांची एवढी भीषणता पब्लिकला किंवा सेन्सॉर बोर्डाला जाणवत नसावी. त्यामुळे दु:खं झाले की हिरो पेग भरणार किंवा खूश झाला तरी पेग भरणार. कित्येक हिरो हे स्टाइल म्हणून सिगारेटी वगैरे फुंकत. अगदी खुशीत असताना किंवा टेन्शनमध्ये असताना देखील. ‘दिल एक मंदिर’मध्ये राजेंद्रकुमार दुसऱ्या दिवशी राजकुमारचे ऑपरेशन करणार असतो त्यासाठी तो त्या केसचा अभ्यास करत असतो आणि म्हणून म्हणे सिगारेटी ओढतो. देवानंदचे “मै जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फिक्रको धुवेमे उडाता चला गया” हे गाणं तर आजही तितकेच लोकप्रिय आहे. पूर्वी ‘दम मारो दम’ हे लोकप्रिय गाणं होतं, तर आता ‘हुक्का मार’सारखं. या फिल्मी हिरोंची नक्कल तरुणाई आंधळेपणे करत असतेच. म्हणूनच या फिल्मी हिरोंना जाहिरातींसाठी मोठा भाव असतो आणि समाजही त्यांच्याकडे रोल मॉडेल म्हणून पाहत असतो.
सुशांतसिंग राजपूत या गुणी कलाकाराची व्यसने त्याच्या मृत्यूनंतर समोर आली. त्याच्या व्यसनानेच त्याचा बळी घेतला. त्यानंतर कंगना रणाैतला तिनेच स्वतःला कसे ड्रग्जचे व्यसन लागले वगैरे सांगितले, त्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. संजय दत्त तर ड्रग्जच्या आहारी गेला होताच. शाहरुख खान तर सतत सिगारेटी फुंकतो इतकेच नव्हे, तर सिगारेटची जाहिरात देखील करायला कचरत नाही. पूर्वी एका मुलाखतीत स्वतः ड्रग्ज घेत नाही किंवा लफडी केलेली नाहीत हे सरळ न सांगता त्याने फिल्मी स्टाइलने सांगितले. “मी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या म्हणजे ड्रग्ज घेणे, पोरींशी लफडी करणे वगैरे माझ्या पोराने कराव्यात” असं म्हणाला. त्याचा मुलगा आर्यन खानने मात्र बापाचा सल्ला एकदम मनावर घेतला. तोही प्रभू रामाप्रमाणे आदर्श मुलगा म्हणायला हवा. रामाने आपल्या वडिलांचा शब्द पाळायला राज्याभिषेक सोडून वनवास पत्करला त्याचप्रमाणे आर्यनने ड्रग्ज प्रकरणात मन्नतसारखा भव्य अतिसुंदर बंगला सोडून आर्थर रोडवरील तुरुंगातील खोली मिळवली आणि आता तर सर्व बॉलिवूड हा ड्रगच्या आहारी गेलेला आहे आणि त्याचा शोध सध्या सुरू झालेला आहे म्हणे! ९९% बॉलिवूड नाशेडी आहे, असं बोललं जातं. आता तर NCB देखील त्या ९९% लोकांचा शोध घेताहेत. काय पण हा त्यांचा अडाणीपणा! ते ९९ टक्के लोक शोधण्यापेक्षा तो नशापाणी न करणारा एक टक्का शोधाना म्हणजे काम सोपे. आमची आई लहानपणी तांदूळ निवडताना एकेक तांदूळ नाही बघत बसायची, तर त्यातला फक्त एकेक खडा बाजूला करत असे. तसे NCB ने करायला नको? असो! पण आता त्या दिशेने NCB हळूहळू पण दमदार पावलं मात्र टाकत आहे. देर आवत, दुरुस्त आवत.
आता कुणी म्हणेल की, ती श्रीमंत बापाची कार्टी स्वतःच्या पैशाने नशा करून स्वतःची तब्येत बिघडवतात, तर त्यात इतरांनी का नाक खुपसावं? वरून हा प्रश्न दिसतो तितका साधा नाहीये. एकदा का या नशेची लस लागली की ती सोडवणे मुश्कीलही नही नामुमकिन असतं. पोराला त्या ड्रग्जसाठी काहीही करून पैसे हवेतच. कितीही पैसेवाला असला तरी तो कमी पडू लागतो. मग काय? चोरी करणे. प्रथम ते आपल्या स्वतःच्या घरातूनच आईचे दागिने, बापाचे पाकीट इथून सुरुवात करतात. घरचे सोर्सेस संपल्यावर ओळखीच्या लोकांकडे मागणे अथवा चोरी करणे आणि शेवटी पब्लिकमध्ये अधिक गंभीर गुन्हे करायला धजावतात. सुंदर मुली तर आपल्या शरीराचा वापर करतातच. अशा रीतीने समाजस्वास्थ्य बिघडते. म्हणून या व्यसनाला अगदी प्राथमिक अवस्थेतच चिरडणे आवश्यक आहे. जगभर ही समस्या गंभीर बनलेली आहे. त्यामुळेच जगात सर्वत्र ड्रग्ज बाळगणे, विकणे वा खाणे, पिणे, ओढणे याला अतिशय कठोर शिक्षा आहेत.
हे ड्रग्ज येतात कुठून? याचा व्यापार करणारे कोण असतात? हा पैसा जातो कुठे? या सगळ्यांचे उत्तर म्हणजे राष्ट्रद्रोही टेररिस्टस. तालिबानी लोकांचे उत्पन्न या व्यवहारात लपलेले आहे. म्हणजे जेव्हा कोणी ड्रग्ज घेतो तेव्हा तो फक्त स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचेच, देशाचे नुकसान करतो, असे नाही तर तो तालिबान्यांना मदत करून देशद्रोह देखील करत असतो. घरचे जेव्हा याबाबत अनभिज्ञ असतात तेव्हा ते पोलीस कम्प्लेंट करतात. पोलीस जेव्हा पोरगा नशेडी आहे हे सांगतात, तेव्हा त्यांना धक्का बसतो, पण तोवर खूप उशीर झालेला असतो. म्हणून सुरुवातीलाच ‘‘से नो टू ड्रग्ज’’.