Friday, December 13, 2024
Homeक्रीडाद्रविड होणार मुख्य प्रशिक्षक

द्रविड होणार मुख्य प्रशिक्षक

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर स्वीकारणार सूत्रे; बीसीसीआयची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): माजी कर्णधार आणि बंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांची भारताच्या सीनियर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर तो जबाबदारी स्वीकारणार आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

द्रविडचा करार २०२३ पर्यंत असेल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडची भेट घेतली. दोघांनी द्रविडला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी विनंती केली होती अखेर ती विनंती द्रविडने मान्य केली आहे.

सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर संपत आहे. राहुल द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो भरतची जागा घेईल. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विक्रम राठोड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.

४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. त्याने यापूर्वी, श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. द्रविड हे १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहण्याचा प्राधान्य दिले आहे. यापूर्वीही, द्रविडने २०१६ आणि २०१७ मध्ये अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. मुख्य संघाला प्रशिक्षण देण्याऐवजी तरुण खेळाडूंना तयार करण्यासाठी क्रिकेट अकदामीमध्येच काम करण्याला प्राधान्य दिलं होतं.

…तर अन्य देशांनी सावध व्हा : वॉन

राहुल द्रविड टीम भारताचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल, हे खरे असेल तर अन्य देशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे ट्विट इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले आहे. वॉनसोबत माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनेही एक मजेदार ट्विट केले. परवापर्यंत राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) राहील, असे वृत्त होते, पण काल सकाळी तो भारताचा नवा प्रशिक्षक बनत असल्याचे समोर आले. मग मध्यरात्री काय झाले? माझा अंदाज असा आहे की, लॉर्ड शार्दूलने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी केकवर मेणबत्त्या पेटवल्या आणि त्याला राहुल भाईला प्रशिक्षक करण्यास सांगितले. कदाचित त्याची इच्छा पूर्ण झाली असेल, असे जाफर म्हणाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -