सुधागड-पाली (वार्ताहर): सुधागड तालुक्यातील व-हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील दांडकातकरवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने अदीवासी बांधवांना अंत्यविधीसाठी वणवण करावी लागत होती. याबाबत वारंवार वर्तमानपत्रांमध्ये आवाज उठवल्यानंतर हा विषय निकाली निघाला खरा. व-हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायतीने २ लाख २२ हजार रुपये खर्च करून दांडअदीवासीवाडीला स्मशानभूमी बांधण्यात आली. एवढे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याकरिता मार्ग नसल्यामुळे ग्रामस्थांना नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमित अंत्यविधी न करता आजही दगडी रचून अंत्यविधी केली जात आहे.
आधी लढा दिला तो स्मशानभूमीसाठी आता लढा आहे स्मशानभुमी कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दांडआदिवासी वाडीतील ग्रामस्थांच्या समस्यांचा तोडगा निघणार निघणार तरी कधी ? असा संतप्त सवाल दांड वाडीतील आदिवासी ग्रामस्थ विचारत आहे.
आज पर्यंत आमच्या वाडीला स्मशान भूमी मिळावी याकरिता अनेक वेळा निवेदनदेऊन संघर्ष करावे लागले आहे. आज नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता नाही.जो पर्यंत आम्हाला स्मशानभूमी कडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही नव्याने बांधण्यात आलेला स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करणार नाही. – शंकर पवार, ग्रामस्थ दांडआदिवासीवाडी