Friday, March 13, 2026

एक हात तोडून मृतदेह बॅरिकेड्सला बांधला

एक हात तोडून मृतदेह बॅरिकेड्सला बांधला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): राजधानी दिल्लीबाहेरील सिंधू सीमेवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडलेला मृतदेह पोलिसांच्या बॅरिकेड्सला बांधलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेड्सला बांधलेला आढळला. या व्यक्तीच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार स्पष्ट आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.

सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. तिथे शुक्रवारी पहाटे ५ वाजता हात बांधून बॅरिकेड्सला बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पाहणी केली, असे पोलीस उपअधीक्षक हंसराज यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या हत्येमागे निहंगा असल्याचा आरोप ४० शेतकरी संघटना एकत्र येऊन तयार झालेल्या संयुक्त किसान मोर्चाचे केला आहे. या घटनेशी आमचा संबंध नसल्याचे सांगताना हत्येतील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरियाणा सरकारला सहकार्य करण्यास तयारी आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment