Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमाथेरान शटल सेवेत आता केवळ दोनच डबे

माथेरान शटल सेवेत आता केवळ दोनच डबे

पर्यटकांमध्ये नाराजी

नेरळ (वार्ताहर) : मिनिट्रेनची माथेरान-अमन लॉज-माथेरान या शटल सेवेची वाहतूक करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने बनवेगिरी सुरू केली आहे. पर्यटक प्रवाशांची गर्दी असतानाही एक प्रवासी डबा कमी लावला जात असून तो माथेरान स्थानकात उभा ठेवण्यात आला आहे. दरम्यान, तो प्रवासी डबा तत्काळ लावण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शटल सेवेचा एक डबा कमी करण्यात आला. अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंतची रेल्वेची शटल सेवा पर्यटक आणि स्थानिकांसाठी मोठी सुलभ व फायदेशीर ठरली आहे. सुरुवातीला पाच सेकंड क्लासच्या डब्यांनी सुरू केलेली मिनी ट्रेनची शटल सेवा तीन डब्यांवर आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून आणखी एक डबा कमी केल्याने अवघे दोन सेकंड क्लासचे डबे लावून गाडी चालवली जात आहे. त्यामुळे ९० ऐवजी केवळ ६० प्रवासीच प्रवास करू शकतात.

माथेरान शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या सहीचे पत्रासोबत माथेरान रेल्वेचे स्टेशन मास्तर जी. एस. मीना यांची भेट घेऊन तत्काळ डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली. या वेळी नगरसेवक शिवाजी शिंदे, महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षा शिंदे, नागरी पत संस्थेचे सभापती हेमंत पवार, धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकले सामाजिक कार्यकर्ते नितीन शाह आदी उपस्थित होते.

माथेरानला वाहन बंदी आहे. टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने मिनी ट्रेनची शटल सेवा सर्वांना सुलभ आहे. लवकरच दिवाळी सीजन सुरू होत आहे. डब्यांची संख्या वाढली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या मागणीची दाखल डीआरएम ऑफिसने घेतली असून मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी लवकरात लवकर नेरळ यार्डात डबे माथेरानला पाठवण्यात येतील, असे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -