महामार्गाचे रखडलेले काम, खड्डेमय रस्ते याचेही श्रेय घ्यावे शिवसेनेने…

Share

नरेंद्र मोहीते

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे फुकाचे श्रेय लाटू पहाणाऱ्या शिवसेनेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विमानतळ लोकार्पण सोहळ्यातच या विमानतळाला कोण विरोध करत होते हे पुराव्यासह दाखवत खुद्द मुख्यमंत्र्यांसमोर चांगलेच उघडे पाडले. मात्र दुसऱ्यांनी पाठपुरावा केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री, खासदार आणि आमदारांनी रत्नागिरी जिल्ह्यात रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग, रत्नागिरी शहरासह अन्य शहरे आणि ग्रामीण भागांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यांची झालेली दुरवस्था याचेही श्रेय घ्यावे अशा संतप्त प्रतिक्रीया आता जनतेतून उमटत आहेत.

तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी मग रत्नागिरी विमानतळावरून आजपर्यंत नियमित विमान वाहतूक का सुरू झाली नाही, हे देखील एकदा जनतेला सांगावे अशीही मागणी होत आहे. कोणतेही काम पुर्णत्वाला गेले की त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडायचे हे शिवसेनेचे पुर्वीपासूनच धोरण राहिलेले आहे. मग कोणत्याही कामाचा शुभारंभ असो वा भुमिपुजन असो. अशाच प्रकारे काही दिवसापुर्वी शिवसेना खा. विनायक राऊत यांनी चिपळूण येथील वाशिष्ठ नदीवरील पुलाची एक मार्गिका घाईगडबीत फित कापून सुरू केली होती. कोणताही पुर्वनियोजित कार्यक्रम नसताना, प्रशासनाने कार्यक्रम ठरविलेला नसताना खा. राऊत यांनी या पुलाची फित कापली. मात्र आठच दिवसात या पुलावरिल रस्ता पुर्णपणे उखडला असून आतील लोखंडी सळया दिसू लागल्या आहेत. त्यामुळे मग आता या पुलाच्या निकृष्ठ कामाचे श्रेयही खा. राऊत यांनी घ्यावे अशी चिपळूणवासीयांची मागणी आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेसह अनके पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. तर मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि चार आमदारही शिवसेनेचे आहेत. ज्या कोकणी माणसाच्या जीवावर शिवसेना राजकारण करते व करत आहे त्या कोकणी माणसाला शिवसेनेने सत्तेच्या माध्यमातून काय दिले, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागले अशी आज जिल्ह्यात अवस्था आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तर ग्रामीण भागात रस्ते शोधावे लागत असून एसटी सेवाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. दोन महिने झाले रत्नागिरी – पाली आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. तर राजापूर, ओणी-पाचल अणुस्कूरा घाट रस्त्याचीही पुरती दुरावस्था झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता असूनही ग्रामीण भागात पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागत आहे. रत्नागिरी जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा दरवर्षी केल्या जातात. पण त्या पावसाळ्यात येणाऱ्या पुरात वाहून जातात अशी अवस्था आहे.

मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रत्नागिरी जिल्ह्यात रखडलेले आहे. सिंधुदुर्गात ९५ टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार, भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे आणि कणकवीलचे आमदार नितेश राणे यांनी हे काम दर्जेदार झाले पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आणि ते पूर्ण करून घेतले आहे. मग सिंधुदुर्गात झाले ते रत्नागिरीत का नाही होत? शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार करतायत काय? असा जनतेचा सवाल आहे.

त्यामुळे चिपी विमानतळाचे फुकाचे श्रेय लाटू पहाणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यात रखडलेली ही कामे आणि जिल्ह्यातील विकासाची झालेली दुर्दशा याचेही श्रेय घेणे गरजेचे आहे. सत्ता आणि पदे असूनही आंम्ही जनतेसाठी काही करू शकत नाही हे जनतेला सांगितले पाहिजे. कारण रत्नागिरीतील जनतेला आजही प्राथमिक सेवा सुविधांसाठी झगडावे लागत आहे. याला जबाबदार कोण आहे?

रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. सन १९९० पुर्वी विकासाच्या बाबतीत मागास असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आज सर्वच बाबतीत विकासात पुढे गेला आहे. याचे सारे श्रेय हे ना. राणे यांनाच आहे हे सर्वश्रृत आहे. मात्र जे राणेंनी करून दाखविले ते रत्नागिरीतील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना का जमले नाही हा जनतेचा सवाल आहे. चिपी विमानतळाला कोणी विरोध केला हे राणेंनी जाहीर कार्यक्रमात पुराव्यासह दाखविले. मात्र त्यानंतर आपल्या भाषणात कोकण विकासावर भाष्य करण्याचे सोडून मुख्यमंत्र्यांनी केलेले राजकिय भाषण शिवसेना कोकणला काही देऊ शकत नाही हे सांगून गेले. त्यामुळे न केलेल्या कामांचे फुकाचे श्रेय लाटू पहाणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री, खासदार आणि आमदारांनी न झालेल्या विकासाचेही श्रेय आपल्याकडे घ्यावे अशा प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहेत. तर चिपी विमानळाच्या उद्घाटनाचे यजमान म्हणून मिरवणाऱ्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तुमच्या रत्नागिरीतील विमानतळावरून विमान कधी उडणार ते जरा जनतेला सांगावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

49 mins ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

2 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

3 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

5 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

6 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

6 hours ago