Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखगणेशभक्त कोकणवासीयांची लुटमार थांबणार कधी?

गणेशभक्त कोकणवासीयांची लुटमार थांबणार कधी?

गणेशोत्सव आला की मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार अशा महामुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसाला किंबहुना प्रत्येक चाकरमान्याला वेध लागतात ते कोकणातील आपल्या गावाचे. तेथे जाऊन गणपती बाप्पांची यथासांग पूजा-अर्चा करून जमल्यास सत्यनारायणाची पूजा, भजनांचे कार्यक्रम यांचा मेळ घालून एक वेगळे आत्मीक समाधान पदरात पाडून घेण्यासाठी त्याची, त्याच्या कुटुंबीयांची अहमहमिका सुरू असते. त्यातून त्याला कोकणची प्रचंड ओढ लागते. त्यासाठी तो रेल्वे, एसटी, खासगी लक्झरी बस किंवा अन्य वाहनांच्या माध्यमातून गावी जाण्याचा प्लान आखतो. त्याची ही योजना वाटते, तितकी सहजसोपी कधीच नसते व नाही. त्याला गावी जाण्याची (कोणत्याही वाहनाची) तिकिटे मिळविण्यासाठी जंगजंग पछाडावे लागते. ज्यांनी आधीच कार्यालवीन सुट्टीचे नियोजन करून चार महिन्यांअगोदर रेल्वेचे रिझर्व्हेशन केले असेल ते मात्र कामलीचे नशीबवान. पण अशांची संख्या ही अगदीच नगण्य म्हणावी लागेल. कारण कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांची तिकिटे ही रिझर्व्हेशनची प्रक्रिया सुरू होताच काही मिनिटांतच गाड्या फुल्ल होऊन जातात व निराशा पदरी पडते. त्यानंतर लोकांची अन्य मार्गाने तिकिटे पदरात पाडून घेण्यासाठी धावपळ सुरू होते. काहीजण आपल्याला हव्या त्या दिवसाची आणि हवी त्या वाहनांची तिकिटे मिळविण्यात यशस्वी ठरतात आणि उरलेल्या जीवांची सुरू होते न संपणारी परवड.

मात्र गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून कोकणातील लोकप्रिय भाजप आमदार नितेश राणे यांच्यातर्फे ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडली जाणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असून त्यासाठी आरक्षण करावे लागणार आहे. कोकणचा स्वाभिमान नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणाला आशीर्वाद दिला असल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी नितेश राणेंतर्फे मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येत आहे. ही ट्रेन १८०० नागरिकांसाठी सोडण्यात येणार असून, दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. तसेच प्रवासात एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार आहे. हा झाला एक स्तुत्य उपक्रम.

कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने त्यानिमित्त एसटीने जादा बसेस सोडल्या आहेत. त्याशिवाय, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेनेही अतिरिक्त एक्स्प्रेस चालवल्या आहेत. कोकणावासीयांकडून याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. मात्र, एसटी आणि रेल्वेत आरक्षण न मिळाल्याने अनेकजण नाईलाजापोटी खासगी वाहतुकीचा पर्याय अवलंबतात. अशा नाडलेल्या प्रवाशांची असलेली गरज पाहता खासगी बसचालकांकडून मोठ्या प्रमाणावर तिकीट दर वाढविले जातात. विशेष म्हणजे अधिक बस असल्याने आसनेही रिक्त असतात. मात्र सणानिमित्ताने ही दरवाढ करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

कोरोना महामारीचा जोर ओसरल्याने आता सर्व काही पूर्वपदावर आल्याने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. अनेकांचा गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचा ओढा असल्याचे दिसून येत आहे. मात्र गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या व पेचात सापडलेल्या या सामान्यजनांची खासगी ट्रॅव्हल चालकांकडून लूट होत असल्याची बाब समोर आली आहे. जादा बस असल्या तरी गणेशोत्सवानिमित्ताने अधिक भाडे वसूल केले जात असल्याचे उघड सत्य आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दर निश्चितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी आपले तिकीट दर दुप्पट केले आहेत. त्यानुसार राजापूरकडे जाण्यासाठीचे दर हे नॉन-एसीसाठी १३०० रुपये आणि एसी सीटिंगसाठी सुमारे २१०० रुपये दर आहेत. प्रत्यक्षात खासगी ट्रॅव्हल्सकडे हे दर असले तरी ऑनलाइन बुकिंग अॅप्सवरही हे दर अधिक असल्याचे म्हटले जाते. फक्त गणपतीचा सण आहे म्हणून दर अधिक असतात व गणेशोत्सवाचा सण संपल्यानंतर दर पुन्हा सामान्य केले जातात, ही नित्याचीच बाब आहे. गणेशोत्सवानंतर कोकणात होळीचा मोठा सण असतो. त्यानंतर मे महिन्याची उन्हाळी सुट्टी, दिवळीचे दिवस, नाताळची सुट्टी असो, अशा महत्त्वाच्या सुट्टीच्या दिवसांमध्येही खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून दर वाढविले जातात आणि सामान्य प्रवाशांची लूट केली जाते. गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. याच काळात खासगी वाहतूक करणाऱ्या बसचालकांकडून प्रवाशांकडून अवाच्या सव्वा पैसे आकारले जातात.

विशेष म्हणजे एसटी तिकिटाच्या दीडपट अधिक दर घेण्यास ट्रॅव्हल्स चालकांना परवानगी आहे. मात्र त्याहून अधिक दर आकारला जात असेल, अशा ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे वक्तव्य प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र आता ट्रॅव्हल्स चालकांच्या याच मनमानीला आळा बसविण्यासाठी अंधेरी आणि बोरिवली आरटीओने कंबर कसली असून बसचालकांकडून होणाऱ्या लुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड तयार केले आहेत. त्यांच्या मदतीने प्रवाशांना लुटणाऱ्या बसचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आरटीओने गणेश भक्तांसाठी एक हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी देखील उपलब्ध करून दिला असून जे बसचालक प्रवाशांकडून अधिक पैसे मागतात, अशा बसचालकांची तक्रार करण्याचे आवाहन मुंबई प्रादेशिक वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. वाहतूक विभागाकडून देण्यात आलेला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून परिवहन विभागाकडून संबंधित बसचालक आणि कंपनीवर मोटर वाहन अधिनियमातील तरतुदीअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या मजबुरीचा गैरफायदा घेणाऱ्या या लुटारूंना जरब बसण्यासाठी लोकांनी पुढे होऊन तक्रार करायला हवी. तरच नेहमी जबरस्तीने होणारी ही लूट थांबेल अन्यथा ही परवड अशीच सुरू राहील, हे निश्चित.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -