Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सDiet Lagna : तरुणाईसाठी हेल्दी एक्झरसाइज डाएट लग्न

Diet Lagna : तरुणाईसाठी हेल्दी एक्झरसाइज डाएट लग्न

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

मराठीत स्त्री नाटककारांची तशी वानवाच आहे. नाट्यसंहितेतून स्त्रीसुलभ जाणिवा अधिक टोकदारपणे व्यक्त होऊ शकतात, हे सत्य स्त्रीलेखिकांना उमजायला अजून किती काळ जाणार आहे कुणास ठाऊक! इरावती कर्णिक, स्वरा मोकाशी, कल्याणी पाठारे, डाॅ. श्वेता पेंडसे, मुग्धा गोडबोले या गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या स्त्री नाटककार आपला ठसा मराठी नाट्यसृष्टीवर उमटवत आहेत; परंतु गेली वीस वर्षे सातत्याने नवनव्या विषयांवर लिहिणाऱ्या स्त्री नाटककाराचे नाव घ्यायचे झाल्यास मनस्विनी लता रवींद्रला पर्याय नाही. नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट मनस्विनीला प्रत्येक माध्यमाचे भान असल्याचा प्रत्यय येतो. त्यातही नव्या पिढीशी असलेला तिचा कनेक्ट नवे प्रश्न प्रेक्षकांसमोर सहज मांडून जातो. त्या त्या वयाची साधी सोपी व्यवहाराची भाषा संवादित होताना नटांनाही त्यात आपली भूमिका सापडत असणार, यात शंकाच नाही. अशाच एका वर्गाचं म्हणजे तरुणाईचं नाटक नुकतंच प्रकाशित झालंय, ते म्हणजे “डाएट लग्न” ज्याची लेखिका मनस्विनी लता रवींद्र आहे. सिगारेट्स ते अमर फोटो स्टुडिओपर्यंतचा मनस्विनीचा नाट्यलेखनाचा आलेख सतत उंचावणाराच आहे. संकल्पनेत वेगळेपण नसले तरी त्यात डोकावणाऱ्या गोल्डन मीनला कसं विस्तारीत अथवा हायलाइट करायचं, याचं तंत्र तिला गवसलंय. लग्नबंधनात अडकलेलं तरुण जोडपं, एकमेकांच्या भावनांची गळचेपी करत शेवटी विभक्त होण्याऐवजी मॅरेज काऊंसिलरच्या सल्ल्याने वाढलेलं प्रेमाचं अतिरिक्त ओझं डाएट प्लाननुसार संतुलित करतात, अशी या “डाएट लग्न”ची वनलायनर म्हणता येईल.

नाटकाचा पहिलाच प्रसंग समुपदेशिकाच्या क्लिनिकमध्ये घडतो, त्यामुळे नवरा-बायकोमधील नातेसंबंधातील चढ-उतारांना आपल्याला सामोरं जावं लागणार, याचा अंदाज येतो. समुपदेशिकेचा तो डाएट प्लान अमलात आणण्याचे उपायच मुळी नाटक पुढेपुढे नेत राहतात. लग्न झाल्यानंतर एकमेकांना समजून घ्यायला नवरा-बायकोला निश्चित असा किती काळ लागतो? स्त्री स्वातंत्र्याची गळचेपी ही लग्नानंतरची कायमस्वरूपी समस्या आहे का? पुरुषांचा नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा “मटेरियलिस्टिकच” का असावा? नवी पिढी स्वतःच्या स्पेसच्या शोधात “छोटा ब्रेक” घेण्याच्या नव्या सायकाॅलाॅजिकल तंत्राचा सर्रास वापर करणार का? अशा अनेक प्रश्नांची उकल हे नाटक आपल्या समोर मांडते. खरं तर चर्चानाट्याचा बाज असणारं नाटक केवळ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या सातत्याने प्रसंगानुरूप बदलत ठेवणाऱ्या दृष्य संकल्पनेमुळे अधिक प्रभावी ठरले आहे. त्यामुळे लेखिकेद्वारे लिहिल्या गेलेल्या विविध स्थळांचा दिग्दर्शकीय वापर केंकरेची गुणवत्ता नक्कीच सिद्ध करतो. पात्रांची कंपोझिशन्स, स्थळ-काळ बदल, संवादाविना मुव्हमेंट्स आणि पात्रांच्या काॅर्डिनेशन्समधे दिग्दर्शक दिसतोच दिसतो. खरं तर गुणी टॅलेंटला दिग्दर्शक कशा प्रकारे वापरून घेऊ शकतो याचं “डाएट लग्न” हे अचूक उदाहरण म्हणता येईल. त्यातही यातील तिघांचेही चेहरे रंगभूमीसाठी ताजे असल्याने प्रेक्षकांस नक्कीच फ्रेश वाटत असणार.

लग्न करून बसलेली आजची तरुण पिढी स्वतःला जरी भावनिकदृष्ट्या सुदृढ समजत असली तरी त्यांचे टेम्पर म्हणावे तेवढे सुदृढ नाही. सशक्त आकलनशक्ती म्हणजे सशक्त व्यवहार समजण्याचा घोळ ही पिढी कायम करत आली आहे. त्रयस्थ मध्यस्ताशिवाय निर्णय घेण्यात तरुण पिढी कायम कमी पडते. या पिढीचा अजून एक अवगुण म्हणजे “टोकाचा किंवा अंतिम निर्णय” घेण्याचा हव्यास. व्यक्तिस्वातंत्र्याचा हवा तसा अर्थ लावून स्वतःला समस्येच्या केंद्रस्थानी ठेऊन नात्यांमध्ये क्लिष्टता निर्माण करण्याची वृत्ती विवाह संस्थेच्या मुळावर आली आहे. लग्न ही गाजराची पुंगी झाली आहे. बरं काडीमोड घेण्याचं दुःख कुणालाही नाही. ही पिढी नव्या नात्याचा श्रीगणेशा करायलाही तेवढीच तत्पर आहे. त्यामुळे फास्टफूडच्या रेसिपीजप्रमाणे “सर्व्ह” होणारे लग्न, अजीर्ण झाल्याने डाएट करण्याच्या गरजेवर येऊन थांबते. लेखिकेने काऊंसिलरचा वापरलेला डिव्हाईससुद्धा जाणूनबुजून घटस्फोटित ठेवला आहे. मीराचं (काऊंसिलरचं) होऊन गेलेलं भूतकाळातलं नातं आणि हृताच्या नवऱ्यासोबत (आलोकसोबत) काॅलेज काळात कधीच न होऊ शकलेलं नातं अशा दोन मानसिकतेच्या शेड्सवर हे पात्र उभं आहे. त्यामुळे इमोशनल मॅच्युरिटीचा भक्कम पाया या व्यक्तिरेखेजवळ आहे. फुटकळ विनोद करायची मुभा जरी हृता आणि आलोक असली तरी लेखिकेने ती मीराला दिलेली नाही. मध्येच एखाद्या प्रसंगी आलोकला ती लाडीकपणे “वांग्या” म्हणून हाक मारते. पण ते संबोधन दोघांचे भूतकाळात संबंध होते, याचं द्योतक आहे… आणि तो क्ल्यू प्रेक्षकांसाठी आहे.

तेव्हा “डाएट लग्न”ची संहिता एक सशक्त वैचारिक नाटक आहे. व्यावसायिक नाटकाच्या रूपात सादर करण्यासाठी चढविण्यात आलेलं तत्त्वाचं शुगर कोटिंग उत्तम आहे. त्यामुळे नाटकाचे सादरीकरण तात्त्विक अंगाने होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण आंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य या चार अभिनय प्रकारांबरोबरच तात्त्विक ही नवी देण विसाव्या शतकातील नाट्यअभ्यासकांनी रंगभूमीला दिली आहे, याची नोंद घेणे या संहिता-प्रयोगाच्या निमित्ताने शक्य होत आहे. हृता, आलोक आणि मीरा यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यामुळे तिघांच्याही वाट्याला आलेल्या संवादांचे तिघेही सोने करतात. शनाया ते हृता या प्रवासातील रसिका सुनीलचा अभिनय विकास नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. सिद्धार्थ बोडकेचा आलोक मात्र शेवटी शेवटी प्रभावहिन होत जातो. कदाचित हृताच्या अॅटिट्यूडचे लाॅजिक अधिक स्ट्राँग झाल्याचा तो परिणाम असावा. मीराच्या भूमिकेला वैष्णवी आर. पी. न्याय देते.

या नाटकाबद्दल मी मुद्दामच थोडं उशिराने लिहावं असं ठरवलं होतं, कारण सध्याच्या पोस्ट कोविड काळात प्रेक्षकांची खर्च करण्याची वृत्ती अत्यंत चिकित्सक झालीय. चारचौघांशी बोलून किंवा इंटरनेट वा प्रसार माध्यमावरील रिव्ह्यूज तरुणवर्ग तरी वाचू लागलाय. त्यांना मनोरंजनासाठी “स्टार्स” लागत नाहीत. त्यांची लाॅजिक्स आणि प्रिन्सिपल्स समोर सादर होताना दिसली की, तो वर्ग ते नाटक डोक्यावर घेतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनस्विनीचेच “अमर फोटो स्टुडिओ” होते. “डाएट लग्न”सुद्धा त्याच वर्गात मोडते, फक्त निर्मात्यांकडे पेशन्स हवेत. बाकी शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य यांची स्तुती ती काय करावी? वेशभूषाकार मंगल केंकरे आणि संगीतकार आनंद ओक यांनी नाटकाच्या प्रवृत्तीनुसार अजून थोडा क्रिएटिव्ह विचार करायला हरकत नव्हती. मात्र सविता सूर्यवंशी आणि आदित्य सूर्यवंशी यांनी एका वेगळ्याच विषयावरील व्यावसायिक नाटकाची निर्मिती करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल नक्कीच अभिनंदन करायला हवं. असं म्हणतात की, फसलेल्या प्रत्येक लग्नाची कथा तुलनात्मकदृष्ट्या वेगळी वेगळी, तर असतेच; परंतु ती इंटरेस्टिंगही असते. अशाच एका तरुण जोडप्याचं लग्न तुटू नये, याची काळजी मात्र प्रेक्षकांनी घ्यायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -