भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, दलितोद्धारक डॉ. भिमराव रामजी आंबेडकर कसे घडले, याबद्दल अनेक वदंता सांगितल्या जातात. परंतु त्यांच्या जीवनसंघर्षाची खरी कहाणी जाणून तिच्यापासून प्रेरणा घेणे, हीच या क्रांतिसूर्याला खरी मानवंदना ठरेल.

जीवन माझं कसं घडलं सांगतो सविस्तर
असा मी झालो आंबेडकर।
मॅट्रिक पास झालो तेव्हा माझ्या जनतेनं
सत्कार केला केळुसकर दादासाहेबानं॥

पुस्तक दिलं बुद्ध चरित्राचं मानानं
बुद्ध चरित्रं मननं केलं ध्यान देऊन।
विचारी मन जागं झालं तेव्हापासून
बुद्धाचं ज्ञान, मला गेलं वेड लावून॥

बुद्धाचा धम्म करील मानवाचं कल्याण।
अभ्यास केला धम्माचा मी जीव लावून
बुद्धाला गुरू मानिला हो मनापासून
असा झालो मी आंबेडकर॥

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, दलितोद्धारक डॉ. भिमराव रामजी आंबेडकर कसे घडले, हे या कवनातून मांडले आहे.

१४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू गावी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व माता भिमाई यांच्या पोटी जन्माला आलेला डॉ. भिमराव आंबेडकरांचा क्रांतिकारी प्रवास कसा झाला, याची नाळ कोकणच्या लाल मातीशी जोडलेली आहे. रत्नागिरी जिलतील मंडणगड तालुक्यापासून १७ किमी अंतरावर विशाल अशा डोंगररांगांत विसावलेलं आंबडवे हे बाबासाहेबांचं मूळ गाव. खिशात दमडी नसली तरी अंगावरची चमडी काढून देणारा इथला माणूस, हीच या गावची खरी संपत्ती. याच गावात १८४८ साली जन्माला आलेले रामजी मालोजी सकपाळ १८६६ साली वयाच्या अठराव्या वर्षी ‘१०६, सॅम्पर अँड मायर्नस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’च्या सैन्यदलात भरती झाले. अत्यंत धार्मिक आणि हुशार वृत्तीच्या रामजींनी प्रपंच करावा नेटका, याचा आदर्शच समाजाला घालून दिला. शिकून सवरून मोठा झालेला भिमराव दारिद्रय़ाचे जीवन कंठणा-या आपल्या दलित समाजासाठी काहीतरी मोठे कार्य उभे करेल, याची जाणीव रामजींना होती. त्यामुळे १८९४ साली निवृत्त झाल्यानंतरही केवळ लाडक्या भिवाच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर राहू नये, म्हणून त्यांनी रोजगाराच्या शोधात भ्रमंती सुरू ठेवली. अमराईने नटलेल्या आंबडवे गावात निसर्गसंपदा आणि माणुसकीचा झरा खळखळून वाहत होता. पण अवघ्या ५० रुपये निवृत्ती वेतनावर कुटुंबाचा गाडा कसा हाकणार, भिवाचे शिक्षण कसं करणार, या चिंतेपोटी आंबडवे गाव सोडून रोजगारासाठी रामजींनी स्थलांतर सुरू ठेवले. रामजी सकपाळ कुटुंबीयांचे दापोली मिलिटरी कॅम्प येथे काही काळ वास्तव्य असल्याने भिमरावांचे पहिलीपर्यंत शिक्षण तेथेच झाले. निवृत्ती वेतनापोटी मिळणा-या पैशातून कुटुंबाचा खर्च भागवणे पुढे अवघड झाल्याने रामजींनी रोजगारासाठी अखेर सातारा जिल्ह्याची वाट धरली. त्या काळी साता-यात तलाव उभारण्याची कामे मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने त्यांनी तेथे हजेरीमास्तर म्हणून नोकरी पत्करली. त्यामुळे भिमरावांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे साता-यातील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये झाले. रामजी यांचे आडनाव सकपाळ असले तरी ते आपल्या गावाशिवाची ओळख जपण्यासाठी आंबडवे गावाच्या नावावरून आंबडवेकर हे आडनाव लावत असत. प्रतापसिंग हायस्कूलमध्ये चौथीपर्यंत भिमरावाचे हजेरीपटावर आंबडवेकर हेच आडनाव होते. त्या वेळी प्रतापसिंग शाळेतील एका सर्वसाधारण शिक्षकाने त्यांचं आडनाव घेताना अडखळल्यासारखं होत असल्याने आंबेडकर असा सुटसुटीत बदल केला. आंबेडकरांवरील अनेक चरित्रग्रंथात कृष्णाजी अर्जुन केळुसकर नावाच्या एका शिक्षकाने भिमरावांच्या आडनावात बदल केल्याचे सांगितले जाते. मात्र हा चुकीचा इतिहास असून भिमराव शिकत असलेल्या साता-यातील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये केळुसकर आडनावाचा कोणताही शिक्षक असल्याचा पुरावा सापडत नाही. जातीपेक्षा कर्तृत्वाच्या तेजाने तळपणा-या भिमराव रामजी आंबेडकर नावाच्या प्रजासूर्याला एका ब्राह्मण शिक्षकाने स्वत:चे आडनाव देऊन त्यांचा उद्धार केला, असा खोटा आणि खोडसाळ प्रचार काही मंडळी करतात. मात्र संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातल्यानंतरही आंबेडकर आडनावाचा एकही ब्राह्मण शोधून सापडत नाही, हे सत्य हरी नरके यांनी उघड केलं आहे. साधारण नववीपर्यंत साता-यातील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये शिक्षण झालेला भिमराव उन्हाळी सुट्टीत आंबडवे या मूळगावी येत असे.

साता-यात तलावाची कामे संपल्यानंतर रामजींनी रोजगारासाठी पुन्हा मुंबईची वाट धरली. साधारण नववीत असताना मुंबईत आलेल्या भिमरावाने वडील त्याच्यासाठी घेत असलेल्या परिश्रमाची जाणीव ठेवून अभ्यासातील अव्वल क्रमांक कायम ठेवला. एके दिवशी मरिन लाइन्स परिसरात एका बाकावर बसून अभ्यासात गढलेल्या एका विद्यार्थ्यांला पाहून कृष्णाजी अर्जुन केळुसकर नावाच्या शिक्षकाने भिमरावांशी ओळख काढली. पुढे याच शिक्षकाच्या हस्ते अकरावी पास झालेल्या भिमरावांचा भायखळ्याच्या डबक चाळीत सत्कार झाला. सत्कार तर दूरच पण सभा, कार्यक्रम यांच्याशी दुरान्वये संबंध नसलेल्या दलित समाजातील एका तरुणाचा गौरव होत असल्याचे पाहून डबकी चाळीतील अनेक रहिवाशांची छाती गर्वाने फुलली होती. सत्कार आणि समारंभ म्हणजे काय असते, हे ध्यानीमनी नसलेले दलित समाजातील काही लोक केळुसकर गुरुजींचे भाषण ऐकताना देहभान विसरून अंगात सदरा घालायलाही विसरल्याच्या ऐतिहासिक आठवणी आहेत. अकरावीत चांगल्या गुणाने पास झालेला भिमराव दलित समाजातील पहिलाच विद्यार्थी असावा, त्या वेळी केळुसकर गुरुजींनी भिमरावाला भगवान बुद्धांवरील एक पुस्तक भेट म्हणून दिल्याचा इतिहास आहे. कोकणपट्टय़ात मालवण तालुक्यातील केळुसकर गुरुजींच्या एका पुस्तकाने भिमरावायांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. पुस्तकांवर जिवापाड प्रेम करणा-या भिमरावाने ज्ञानोपसानेलाच जीवनात अधिक महत्त्व दिले. त्यामुळेच विद्येचा हा डॉक्टर भारतातील कोटीकोटी दीनदलितांसाठी प्रज्ञासूर्य ठरला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचं बीज राज्यघटनेच्या माध्यमातून तमाम भारतवासीयांत पेरणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावाला भेट देण्यासाठी आजघडीला जगभरातून अनेक लोक येत असतात.

५ फेब्रुवारी १९६५ रोजी अमेरिकेतील एलिनार झेविएट या परदेशी महिलेने प्रथमच या गावाला भेट देऊन ‘पीएच.डी.’साठी बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रबंध तयार केला होता. शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर आणि श्वासावर बाबासाहेबांचाच अधिकार आहे, या भावनेतून देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोप-यातून बडय़ा हुद्दय़ावर जाऊन बसलेली अनेक मंडळी आंबडवेला बाबासाहेबांच्या स्मारकस्थळी नतमस्तक होण्यासाठी येतात. बाबासाहेबांचे घर असलेल्या आंबडवेतील जागेत त्यांचे छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ साली धम्मदीक्षेनंतर माघी पौर्णिमा, शुक्रवार ८ फेब्रुवारी १९६३ रोजी सकपाळ भावकीचं पहिले बुद्ध विहार आंबडवेत उभारण्यात आले.

बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव ऊर्फ भय्यासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळी विशेष पुढाकार घेतला होता. त्या काळात दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने आमदार जी. बी. कांबळे, भय्यासाहेब आंबेडकर, मिराताई आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते डोंगररांगा तुडवत आंबडवेत दाखल झाले होते. दर्शन नाकारणाऱ्या देवाला नाकारून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवकोटी बांधवांसह नागपुरात मानवेतवर आधारित बुद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यानंतर पिढय़ान्पिढय़ा देवपूजेत रमणाऱ्या आंबडवे गावच्या सकपाळ कुळातील लोकांनी घराच्या दरवाजा-भिंतीवर लटकणा-या देविदेवतांचे नदीच्या पाण्यात विसर्जन केले. आजही बाबासाहेबांच्या आंबडवे गावात धम्मक्रांतीचा रथ पुढे नेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मिराताई आंबेडकर, त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर झटत असतात. पण, सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नकाशावर कायम उपेक्षित राहिलेल्या आंबडवे गावात आजही सोयीसुविधांची वानवा आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला उपचारासाठी मंडगणडला शहरी भागात नेण्याशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे सकपाळ-आंबेडकर कुटुंबीयांनी मॉडर्न कॉलेजच्या रूपात आंबडवेत उच्चविद्या ग्रहण करणारे कॉलेज उभारण्यासाठी दहा ते बारा एकर जागा दिली असली तरी दहावीनंतर मंडणगडला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाण्यापलीकडे स्थानिक विद्यार्थ्यांना पर्याय नाही. त्यामुळे एकूण आयुष्यात शिक्षण हेच सर्वोच्च मानणा-या बाबासाहेबांच्या आंबडवे गावात शिक्षण विकासाचा पाया डळमळीत कसा, असा प्रश्न आंबडवेला भेट देणा-या प्रत्येकाला अस्वस्थ करतो.
(लेखप्रपंचासाठी विशेष सहकार्य सुदाम भागुराम सकपाळ-आंबेडकर आंबडेकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक)