त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात (Trimbakeshwar) खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविक-पर्यटकांना वाहन प्रवेश फीसह शहरात जितके तास वाहन थांबणार तितके पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे दर तासाला भाडे वाढत जाणार आहे. म्हणजे मंदिरात दर्शनासाठी वेळ लागला तर भाविक-पर्यटकांना जास्तीचा भुर्दंड बसणार आहे. तसेच त्र्यंबक नगर परिषदेने जाहीर केलेल्या पार्किंग झोनमध्ये ही वाहने न लावता इतरत्र पार्क केली तर संबंधित वाहनधारकांना मोठा दंडदेखील आकारला जाणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना दर्शनाआधी पार्किंग आणि नो पार्किंग झोनच्या फलकांचेच ‘दर्शन’ घ्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांना त्र्यंबकराजाचे ‘दर्शन’ महागात पडणार आहे.

बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने आता पार्किंगचा ठेका देण्याचे ठरवले असून, तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे. नगर परिषदेस या माध्यमातून वर्षाकाठी किमान ५९ लाख रुपये मिळणार आहेत. पार्किंग झोनशिवाय इतरत्र पार्क केलेली वाहने उचलण्यासाठी दोन टोईंग व्हॅनचाही वापर करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरात प्रवेश करतांना भाविक पर्यटकांच्या वाहनांना नगर परिषद वाहन प्रवेश फी म्हणून पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामध्ये बससाठी १२०, मिनी बसला ७०, तर कार व जीपसाठी ५० रूपये आकारले जातात. या वाहन प्रवेश फीचा वार्षिक ठेका ९२ लाख रुपयांना देण्यात आला आहे. त्यात आता पार्किंग फी द्यावी लागणार असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन दुप्पट महागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here