साहेबांचा प्रॉब्लेम होता. (story) ‘स’ ऐवजी ‘छं’ म्हणायचे. त्यामुळे ४० वर्षांत मुलगी मिळाली नव्हती.

गोदूचा मात्र साहेबांवर जीव जडला होता. अख्खं ऑफिस त्या दोघांना ‘अछं कछं’ चिडवीत होते. (अर्थात निम्मे ऑफिस) निम्मे दुसऱ्या माळ्यावर होते ना?
साहेब नि गोदू यांचा संवाद बिनधोक चाले, तो ऑफिस अवर्स संपल्यानंतर.
छ छा छि छी छु छू!
“गोदू तू ऑफिछ छुटलं की भेट.”
“हो साहेब.”
“छाहेब” साहेब हसले.
“बरं छाहेब” गोदूने उत्कट प्रतिसाद दिला साहेब खूश!
विठूची ड्युटी वाढली. अर्थात ‘छाहेब’ त्यास ‘ओटी’ घसघशीत देत असत न चुकता! विठू खूशमे खूश!
साहेब मनाने चांगले आहेत. गोदूशी (आता नाव जुनकट असलं तरी…) जमलं तर बरं होईल.
सुखात्मे बाईंनी मात्र अनिच्छा दर्शविली होती. ‘स’ला ‘छ’ म्हणणारा? मला चालतं नाही? मग तू दु:खात्मे कशी होतेस सुखात्मे?
गोदू उलटा विचार करी. उलट बोले. ऑफिस घाबरून तिच्या पाठी पाठी ‘अछं कछं’ चिडवे. हसे. फसे. गोदूला पर्वा नव्हती.
घरी मामा-मामी होते. आई-वडील केळशीला होते. मामा-मामींना पगार खूप खूप आवडे. गोदू आख्खा पगार मामीकडे देई ना! मामा खूश! बायको खूश असली की, नवरे खूश असतातच ना! तशातलीच मामांची गत!
“गोदू, आपलं लग्न गाजेल.”
“मला ते पुरतं ठाऊक आहे. ‘छ’मुळे जास्तच चान्स आहे.”
“मला तेही ठाऊक आहे.”
“आपण एक गंमत करू.”
“करूया.” गोदूची कशालाच ना नव्हती.
“पत्रिका छापताना आमचे ‘छ’चा वापर करू. आमचे येथे छ्रीकृपेकरून गोदू आणि छंबाजी (संभाजी) यांचा छुबविवाह (शुभविवाह) रविवार दि. २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ठिकाण छंबाजी यांचे निवाछछतान. पत्ता देत आहोत. अहेर नकोत. जेवण छायंकाळी सर्वांना बिनाछुल्क दिले जाईल. (ज्याला जे हवे ते.) व्हेज, नॉनव्हेज पसंती आपापली. टिक् करा नावापुढे. ऑफिस काय? फुलारले. निजी जीवनात असे प्रसंगच ‘हवा’ निर्माण करतात. नाही का? शिवाय ‘बिनाछुल्क’ मेजवानी! क्या बात हैं?
आख्खं ऑफिस गच्चीवर जमलं. गुलाबजाम, रछगुछ्छे (रसगुल्ले) यावर ऑफिछकरांनी ताव मारला.
साहेब जामेजाम उत्फुल्ल होते. खूछ होते. छुभाशीष (छुबाछीछ) फ्रीमध्ये अॅबंडंट मिळाले. खर्च गोदूच्या मामांचा! एकदाची गोदू घरातून जात होती! एकदाची! माहेराला यायचा प्रश्नच नव्हता.
लग्न लागलं. गाजलं. वाजलं.
“गोदू, नाव घे छंबाजीचं.” मामी म्हणाली.
“हो घेते नं.”
“नीट घे हं.”
“नीटच घेते.”
“चछ सग्गळं” मामी डिवचली.
“सगळ्ळं, छगळ्ळं.”
“आणि ‘छ’चा वापर कर.”
“हो. करते. मामी ऐका.”
“छमोरच्या रांजणात छोळा मोती.
छमछम चांदण्या अवती भवती…” (गिरकी)
छाछरघरी छंबाजीरावांच्या छायेत
गोदूचे लाड अति? किती किती.
मामा नि मामींच्या आठवणी छंगती
गोदू छाछरघरी छुखात नांदती.”
“वा! वाहवा!”
ऑफिसकरांच्या टाळ्यांच्या दुमदुमाटात छप्पर फाडके आवाज घुमला. सासू-सासरे गोदूचे… हो गोदूचे (‘छंबाजी’चे आई-बाप) ते ऐकून सर्द झाले.
ते पण ‘छ’वालेच होते.
छंबाजीचे आई-बाबा!
एकमेकांकडे बघितलं, आश्चर्याने म्हणाले… “छंबाजीची बायको तरी धड बोलेल अछं वाटत होतं! पण तीही तछीच निघाली.”
“अछं कछं?” दोघं प्रश्न करीत होती. एकमेकांना बघत होती.

-डॉ. विजया वाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here