Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीपत्राचाळ घोटाळ्यातील आरोप शरद पवारांनी फेटाळले

पत्राचाळ घोटाळ्यातील आरोप शरद पवारांनी फेटाळले

‘आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार?’

शरद पवार यांचा सवाल

मुंबई : पत्रा चाळप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले आरोप शरद पवार यांनी फेटाळून लावले आहेत. ईडीच्या आरोपपत्रात २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचे नाव आमदार अतुल भातखळकर यांनी घेतले होते. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावर प्रतिक्रिया देताना चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास काय कराल, असा सवाल शरद पवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी काल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत पत्र लिहून पत्राचाळ घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. एकूण ६०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या निकालाची माहिती आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून गोळा केली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक १७३ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेस पक्ष ८४, भाजप १६८ आणि शिंदे गटाला ४२ जागांवर विजय मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्यात, याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. मात्र, महाविकास आघाडीने एकूण २७७ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

यावेळी शरद पवार यांना भाजपदेखील ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा करत असल्याबद्दल विचारण्यात आले. यावर पवार यांनी म्हटले की, आमच्याकडे असलेली अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगितली. आता दुसऱ्यांना ते सर्वाधिक जागा जिंकलेत या आनंदात राहायचे असेल तर राहू द्या, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली. त्यामुळे आता भाजप यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -