लांजा (प्रतिनिधी) : मुचकुंदी परिसर विकास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाला (Rural Hospitals) भेट दिली आणि येथील गैरसोयींबाबत असलेल्या परिस्थितीची पाहणी केली.

तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. यामध्ये रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून काही कर्मचाऱ्यांची नावे केवळ कागदावर आहेत. म्हणजे हे कर्मचारी लांजा ग्रामीण रुग्णालयात काम करत आहेत, असे दाखवण्यात येते मात्र प्रत्यक्षात हे कर्मचारी त्यांच्या सोयींप्रमाणे अन्य ठिकाणी काम करत असल्याची अतिशय गंभीर बाब या चर्चेदरम्यान पुढे आली आहे.

लांजा ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या वैद्यकीय सेवा सुविधांमुळे तालुक्यातील कुवे येथील दोन जुळ्या बालकांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुचकुंदी परिसर विकास संघ या संस्थेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी लांजा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व येथील वैद्यकीय अधिकारी सौ.पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये रुग्णालयात लहान मुलांसाठी आयसीयू बेड बॉक्स उपलब्ध नाहीत. रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांची पदे ही रिक्त आहेत. काही कर्मचाऱ्यांची नावे केवळ कागदावर आहेत. हे कर्मचारी लांजा ग्रामीण

रुग्णालयात काम करत आहेत असे दाखवण्यात येते मात्र प्रत्यक्षात हे कर्मचारी त्यांच्या सोयीप्रमाणे अन्य ठिकाणी काम करत आहेत, ही अतिशय गंभीर बाब या ठिकाणी चर्चेदरम्यान पुढे आली. रुग्णालयातील औषध उपचारांच्या तुटवड्याबरोबरच कर्मचाऱ्यांची रिक्त पदांमुळे त्याचा भार हा उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या रुग्णांना पुरेशी सेवा मिळत नसल्या चर्चेदरम्यान पुढे आले, असे मुचकुंदी परिसर विकास संघाचे माजी अध्यक्ष विजय भगते यांनी पत्रकारांना सांगितले.

त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून या संपूर्ण परिस्थितीवर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांनी आवाज उठवावा अशी मागणी देखील विजय भगते यांनी केली आहे. या भेटीप्रसंगी मुचकुंदी परिसर विकास संघाचे माजी अध्यक्ष विजय भगते यांच्यासह मंगेश बापेरकर, नयन सुर्वे, महेश देवरुखकर, मंगेश गुरव, प्रभाकर राड्ये, राजेंद्र कनावजे, गणेश खानविलकर, संतोष खुलम, सुनील गुरव, शंकर मांडवे, आकाश पवार, ऋषिकेश पवार, सुमित जोशी, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here