बोगोटा (वृत्तसंस्था) : कोलंबियातील एका निवासी भागात विमान कोसळले (Plane crashes). या अपघातात विमानात असलेल्या ८ जणांचा मृत्यू झाला. मेडेलिन येथे ही घटना घडली आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोलंबिया मेडेलिन शहरातील एका निवासी भागातील इमारतीला हे छोटे विमान धडकले. त्यामुळे इमारतीचा सर्वात वरचा मजला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हे अपघाती विमान ट्विन-इंजिन पाईपर होते. जे मेडेलिन शहरातून चोको येथील पिझारो नगरपालिकेकडे जात होते.

कोलंबियातील सर्वात मोठे दुसरे शहर म्हणून मेडेलिन शहराची ओळख आहे. येथील निवासी भागात सोमवारी सकाळी एक छोटे विमान इमारतीला धडकल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. या विमानात वैमानिकासह आठ जण बसलेले होते. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी विमानाने ‘ओलाया हेरेरा’ विमानतळावरून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच इंजिनमधील बिघाडाची जाणीव पायलटला झाली. त्याने विमानतळ प्राधिकरणाकडे याबाबत माहिती दिली होती. मात्र, तो पायलट हा अपघाताला टाळू शकला नाही.

अपघातानंतर विमानतळ प्राधिकरणाने ट्विटद्वारे सांगितले की, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ६ प्रवासी आणि २ कर्मचारी यांचा समावेश होता. तर ज्या इमारतीवर हे विमान धडकले त्या ठिकाणचे लोक जखमी किंवा मृत्यू झाले की नाही? याची माहिती उशीरापर्यंत मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here