चिन्हावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी उडवली खिल्ली

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करताना त्यांच्या ‘मशाल’ या नव्या निवडणूक चिन्हावरुन खिल्ली उडवली.

प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलेल्या नव्या चिन्हासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी ही ‘मशाल’ नसून ‘आईस्क्रीमचा कोन’ असल्याचा टोला लगावला. तसेच हे चिन्ह उद्धव ठाकरेंना का देण्यात आले यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितले. ‘उद्धव ठाकरे या माणसाचे ‘मशाल’ हे चिन्ह होऊच शकत नाही. कारण त्यांच्यातली आग कधीच विझली आहे. खरे तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे, जो थंड पडलेला आहे,’ असे नितेश राणे म्हणाले.

“हा माणूस थंड पडला आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे हे कदाचित निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं. हा थंड माणूस आहे त्याच्या हातात आईस्क्रीमचा कोन द्या असं आयोगाला वाटलं. म्हणूनच निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला. आता तो कोन घेऊन फिरेल तो आणि त्याचा मुलगा,” असा टोमणाही नितेश राणेंनी लगावला.