प्रियानी पाटील

अपघात… न विसरण्याजोगाच ठरला होता तिच्या आयुष्यात. त्या अपघाताच्या जखमा अजून ताज्या ठसठशीत असतानाच घरातून तिच्या विवाहाचा काढलेला विषय तिच्यासाठी
नकोसा ठरलेला.

सकाळी चहा पीत असतानाच मोहक गजऱ्याच्या सुवासाने ती प्रफुल्लित झाली खरी, पण तिचं मन विषण्ण झालं. कारण, हा गजऱ्याचा दरवळ त्या अपघातापूर्वीच तिच्या आयुष्यात दरवळला होता काही क्षण आणि त्या काही क्षणानंतरच तो अपघात झाला होता. अनिरुद्ध स्वतः तो गजरा घेऊन आला होता. हाच गजरा, हाच सुवास… सारं काही जसंच्या तसंच. हा गजरा आपल्याला आवडतो हे केवळ आणि केवळ अनीलाच ठाऊक होतं. मग हा गजरा इथे कसा आला आता? गजऱ्यामुळे अनीच्या अपघाताच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आणि ती मनाने कोलमडली. अनीच्या आठवणींनी ती अस्वस्थ झाली. अनीचं या जगात नसणं तिला सहन होत नसलं तरी अनीचा भास तिला नकळतपणे जाणवू लागला होता.

‘अनी स्वतः आलाय की काय इथे गजरा घेऊन.’ ती जराशी भांबावली. उठली, गोंधळली, तिची नजर अवतीभवती फिरली. अनी आल्याच्या कल्पनेने सुखावली. आईला तिने तत्काळ विचारले, ‘अनी गजरा घेऊन आला का, तू त्याला थांबवलं का नाहीस, तो निघून कसा गेला मला न भेटताच.’ ती बोलतच राहिली. आई तिला म्हणाली, ‘अनी या जगात नाही, तुला कसं समजावावं? त्याला जाऊन वर्ष झालं. आता थोडी बाहेर ये अनीच्या आठवणीतून. नव्याने आयुष्य जग’

आईचं अनीबद्दल असं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून आले. अनीला कसं विसरायचं? आयुष्याचा होणारा जोडीदार होता तो. पण, आज अनी जिवंत नसला, या जगात नसला तरी त्याचे भास मात्र सतावू लागलेले. अनी आजूबाजूलाच असावा, या भावनेने ती अस्वस्थ झाली. तिची नजर त्या गजऱ्यावरच खिळली. कुणी आणला असावा गजरा? आईने तर बिलकूल नाही, मग तिने वडिलांकडे पाहिलं, पण त्यांनीही नाही. मग कुणी? अनीचं अस्तित्व ती यावेळी नाकारू शकली नाही. ती विचाराने सुन्न झाली. तशी आई म्हणाली, ‘सोड आता अनीचा विचार, बाहेर ये यातून. आता तुझ्या विवाहाचा विचार करतोय आम्ही. हा गजरा अनीने नाही
जयने आणलाय.’

‘जय? अगं पण तो?’
‘तो येणार आहे. दुपारी घरी त्याच्याशी गप्पा मार, थोडं मन मोकळं होईल तुझं. जयला आम्ही चांगलं ओळखतो. आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याचा विचार कर.’

‘अगं आई, पण मी जयचा विचार नाही करू शकत. शिवाय अनी गेलाय यावरही माझा विश्वासच नाही बसत. मला त्याचं अस्तित्व जाणवतं. अगं तो वावरतो आसपास माझ्या. तो गेलेला नाही.’ तिचं बोलणं ऐकून आईचे डोळे भरून आले. काल जयचा फोन येऊन गेला, तो हिला अनीचा वाटून गेला. काही दिवसांपूर्वी रस्त्यात अनीचा भास झाला. अनीला जाऊन वर्ष झालं. पण हिला कसं बाहेर काढावं यातून? म्हणून शेवटी जयचा पर्याय समोर आला. त्याचं स्थळ आलं आणि त्याने तिची जबाबदारी स्वीकारायची ठरवली.

दुपारी जय आला तेव्हा त्याने बाहेर फिरायला जाण्याचा विषय काढला. पण ती अनीमध्येच गुंतून राहिली. जयसोबत बाहेर जाणं तिला नको वाटलं. या क्षणीही अनीचीच आठवण. ती जयला म्हणाली, ‘अनीनेही असाच गजरा केसात माळला होता. आम्ही त्यानंतर बाहेर गेलो होतो आणि त्यानंतर अपघात. पण अपघातात अनी गेला. आज तो या जगात नसला तरीही तो आहे. माझ्या भोवती, आसपास. बोलता बोलता तिच्या लक्षात आलं, हा तोच दिवस आहे, तीच वेळ आहे, तोच क्षण आहे. ज्या दिवशी अनींचा अपघात झाला होता. नको, मला नाही यायचं कुठेही, आपण थांबूया घरीच! ती घाबरली क्षणभर. पण, ‘असं काही होणार नाही. तू चल बघू.’ जय तिला जबरदस्तीने बाहेर फिरायला घेऊन आला. तरी अनीचाच विषय… जयचं डोकं भणभणलं. ती त्याला सांगत होती. ‘अनी आहे ना, तो कुठेही गेलेला नाही. त्याचं असणं जाणवतं मला. मला त्याचे प्रत्यक्ष भास होतात.’ जय तिच्या बोलण्यावर काहीच बोलला नाही. रस्त्यातून जाताना आता ते वळण आलं, जिथे अनीचा अपघात झाला होता.

या वळणावरच अनी कायमचा तिला सोडून निघून गेला होता आणि ती एकटी पडली होती. पण आता अगदी काही क्षणातच तिच्या डोळ्यांसमोर काही विचित्र घडतंय असं जाणवू लागलं. या वळणावर नेमकी आता जयची बाईक बंद पडली आणि ती दोघं खाली उतरली. या वळणावर अगदी इथेच अनी कोसळला होता. हेच ते ठिकाण, हीच ती वेळ, हाच तो दिवस, अनीच्या आठवणींनी ती पुरती कोलमडली आणि पुढे पुढे चालू लागली. जयने तिला मागून हाका मारल्या, पण नजरेसमोर अनीच! या ठिकाणी आता नव्याने पुन्हा अपघात होतोय की काय, असं वाटून गेलं आणि भरधाव आलेल्या एका कार पुढून ती वेगाने बाजूला फेकली जाणार इतक्यात तिला कुणीतरी सावरलं. तिला आयुष्यात नव्याने जीवदान मिळालं. पण घाबरून ती बेशुद्ध!

जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती जयला म्हणाली, ‘पाहिलंस ना जय, अनीचं अस्तित्व, अनीचे होणारे भास मी नाकारू शकत नाही. आजही त्याच वळणावर जो अपघात होणार होता, त्यातून अनीने मला वाचवलं. आज अनी नसता तर मी वाचू शकले नसते. मला वेडी म्हण हवं तर, पण मी अनीचं अस्तित्व नाही नाकारू शकत. कारण त्याच्यामुळे मला जीवदान मिळालं. अनी आला नसता तर मी वाचले नसते.’

तिच्या बोलण्यावर जयच्या पापणीच्या कडा ओलावल्या. त्याला सांगावसं वाटलं, ‘तो अनी नव्हता यार, तुला सावरणारा, वाचवणारा, जीवदान देणारा मीच होतो.’ पण त्याचे शब्द त्याने ओठातच ठेवले… आणि भास आभासाच्या प्रत्यक्ष खेळात तो पुरता गुरफटला.