अकोल्याहून माझी बदली फॅक्टरी इन्स्पेक्टर, वर्ग १ (महाराष्ट्र स्टेट) म्हणून कोल्हापूरला झाली होती. माझ्या अमलाखाली कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा (दक्षिण) हे जिल्हे होते. या जिल्ह्यातील कारखाने तपासणीचे काम माझ्याकडे होते.

लहानपणापासून माझा ओढा भक्तीमार्गाकडे असल्यामुळे मला संतदर्शनाची पण फार आवड होती. मी नोकरीत असल्यामुळे बदली होतच राहायची आणि ज्यावेळी संधी मिळे, तेव्हा मी संत दर्शनाला हटकून जात असे.

दि. १६/१२/१९७८ रोजी कुडाळ वायमन गार्डन कारखान्यात काम संपवून निवांतपणे सद्गुरू प.पू. राऊळ महाराजांच्या भेटीसाठी पिंगुळीला मठात गेलो. तेथे अण्णांकडून मला समजले की, बाबा वाडीत आहेत, मठात नाहीत. म्हणून मी माझी गाडी घेऊनच बाबा ज्या वाडीत होते तेथे गेलो. बाबा एका भक्ताच्या घरांत एका बाकावर निवांतपणे बसले होते. मी जाऊन दाराच्या उंबरठ्यावर उभा राहिलो. माझ्या हातात केळी, नारळ, फुले वगैरे प्रसाद महाराजांसाठी म्हणून आणला होता. मी तेथे उभा राहून महाराजांना नमस्कार करणार एवढ्यात बाबांनी शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. अर्वाच्य शिव्यांचा नुसता भडीमार केला. पण मी अगदी निश्चल उभा होतो. एक चकार शब्दही न काढता मी मागच्या पावली गाडीत बसलो व मठाचा रस्ता धरला. प्रसाद तसाच माझ्या हातात होता.

मी गाडी घेऊन मठाकडे चाललो असताना एकच विचार मला सतावत होता. महाराज माझ्यावर एवढे गरम का झाले? माझे काही चुकले का? या विचारांच्या तंद्रीतच बाबा जुन्या मठाकडे असलेल्या कर्दळीकडे उभे होतो. आता क्षणापूर्वी तर बाबा वाडीत आपल्या भक्ताच्या घरी होते. मी गाडीतून आलो. मग महाराज माझ्यापुढे कसे पोहोचले? हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. पण संत पुरुष आपल्या योग सामर्थ्यांच्या जोरावर कुठेही एका क्षणात जाऊ शकतात. असो. मी मठात गेलो तेव्हा बाबांनी अण्णांना हाक मारून माझ्याकडची केळी, नारळ वगैरे घेऊन मला प्रसाद द्यायला सांगितला. मी अण्णांकडून प्रसाद घेऊन माझ्या खोलीवर येण्यास निघालो. पण जाताना बाबांशी मी एका चकार शब्दानेही बोललो नाही.

माझ्या राहत्या खोलीवर गेल्यानंतर मी थोडेसे जेवण घेतले व माझ्याकडे असलेले अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचा फोटो काढून टेबलावर ठेवला. त्यांची विनवणी केली की, माझे जर काही चुकले असले किंवा माझ्या सेवेत काही कमी पडले असेल, तर मला याचा उलगडा व्हावा, स्वामी समर्थांना सर्व काही सांगून मी झोपी गेलो, तेव्हा काही अंतरावर पोहोचल्यानंतर माझ्या गाडीला कोणीतरी हात केला. म्हणून मी गाडी थांबवून डोके बाहेर काढून पाहिले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तेथे प्रत्यक्ष
प. पू. राऊळ महाराज उभे होते.

बाबा येऊन गाडीत बसले. आम्ही परत कुडाळला आलो. वाटेत बाबांनी एका शेताजवळ गाडी उभी करायला सांगितली. तेथे एका शेतकऱ्याला बोलावून त्याच्याकडून एक मुळ्याचे रोपटे मागून घेतले. ती माझ्या हाती दिली आणि सांगितले, ही मुळ्याची भाजी घट्ट धरून ठेव, सोडू नकोस. असे बाबांनी सांगताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी क्षणभर आनंदसागरात तरंगू लागलो कारण मी अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचा भक्त होतो. आणि मुळ्याची भाजी देऊन त्यांना एवढेच सुचित करायचे होते की, मी जन्मभर श्री स्वामी समर्थांची सेवा करावी. कारण स्वामी समर्थांना एकदा कोणीतरी विचारले होते, तुम्ही कोठून आलात? तेव्हा श्री स्वामी समर्थांनी उत्तर दिले होते. मूळपुरुष दत्तनगर : वटवृक्ष. संतपुरुष हे वाचेने सहजासहजी कुठलीही. गोष्ट पटवून न देता कृतीनेच पटविण्याचा त्याचा उद्देश असतो. मला राऊळ महाराजांनी माझ्या मनात उठलेल्या हजारो प्रश्नांची उत्तरे एका मुळ्याचे रोपटे देऊन पूर्ण केली.

त्यानंतर बाबा मला घेऊन कुडाळ एसटी स्टँडवर जायला निघाले. पण वाटेत एका भक्ताच्या घरी थांबले. कुणाला तरी हाक मारून ३० रुपये आणायला सांगितले. नंतर आम्ही एसटी स्टँडवर आलो. तेथे बाबांनी मला १० रुपये काढून दिले व सांगितले तुझे काम झाले आहे. आता तू मालवणला जा आणि खरोखरच बाबांच्या आशीर्वादाने माझ्या मनाचे समाधान झाले.

‘आपणासारखी करिती तत्काळ । नाही काळ वेळ यालागी ।। या उक्तीचा मला त्यावेळी अनुभव आला.

– समर्थ राऊळ महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here