मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मर्यादा सोडल्याचे दिसत आहे. महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजात गैरसमज निर्माण करणे, हेच त्यांचे मिशन आहे की काय, अशी शंका येते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीका केली.

आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, राज्यपाल कोश्यारींचे एक वैशिष्ट्य मी काही वर्षांपासून पाहत आहे. सातत्याने वादग्रस्त, चुकीचे विधान करण्याचा त्यांचा लौकीक आहे. आपल्या विधानातून समाजात गैरसमज कसे निर्माण होतील, याची खबरदारी ते घेतात की काय, अशी शंका येते.

शरद पवार म्हणाले, राज्यपाल कोश्यारींनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकदा नव्हे तर दोनदा वादग्रस्त वक्तव्य केले. राज्यपाल हे एक जबाबदारीचे पद आहे, याचे यत्किंचितही स्मरण नसलेली व्यक्ती, केंद्राने महाराष्ट्रात पाठवली आहे. राज्यपाल ही एक व्यक्ती नव्हे तर एक संस्था असते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून राज्यपालांवर टीका केली नाही. मात्र, आता शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

शरद पवार म्हणाले, कोश्यारींसारख्या व्यक्तींवर राज्यपाल पदाची जबाबदारी असणे योग्य नाही. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. त्यानंतर त्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घ्यावा.

दरम्यान, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले, त्या कार्यक्रमात शरद पवार, नितीन गडकरीही उपस्थित होते. त्यांनी तेव्हाच राज्यपालांचा निषेध नोंदवला नाही, अशी टीका खासदार उदयनराजे यांनी केली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, सर्व कार्यक्रम संपल्यानंतर राज्यपालांनी ते वक्तव्य केले. कार्यक्रमात त्यांचे वाक्य ऐकूही आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here