दोहा (वृत्तसंस्था) : पाच वेळा फिफा विश्वचषक (FIFA World Cup) उंचावणाऱ्या ब्राझीलने स्पर्धेत विजयी सलामी दिली. ब्राझीलने सर्बियाचा २-० असा धुव्वा उडवत फिफा विश्वचषक २०२२ मोहिमेची सुरुवात विजयाने केली. ब्राझीलसाठी रिचार्लिसनने दोन्ही गोल केले. या विजयासह ब्राझील आपल्या गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे.

नेमार आणि व्हिनिसियस ज्युनियरने संधी गमावल्यानंतर रिचार्लिसनने ६२व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. त्यानंतर ७३व्या मिनिटाला व्हिनिसियसच्याच क्रॉसवरून रिचर्लिसनने एक्रोबॅटिक गोल केला.

पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत राहिला. दुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलचा फॉरवर्ड नेमार ज्युनियरने सर्बियन गोलपोस्टजवळ चेंडू घेतला. त्याने गोलची संधी गमावल्यानंतर लेफ्ट फॉरवर्ड विनिशियस ज्युनियरने शॉट मारला. गोलरक्षकाला आदळल्यानंतर चेंडू रिचार्लिसनकडे गेला. येथे रिचार्लिसनने कोणतीही चूक केली नाही आणि चेंडू थेट गोलपोस्टमध्ये टाकून सामन्यातील पहिला गोल केला. ६२व्या मिनिटाला आघाडी घेतल्यानंतरही ब्राझीलने आक्रमण करणे थांबवले नाही. चेंडूवर सतत पोझिशन राखून त्याने सर्बियावर दबाव आणला.

७३व्या मिनिटाला व्हिनिसियसने चेंडू घेऊन सर्बियन गोलपोस्टकडे धाव घेतली. त्याला २ बचावपटूंनी घेरले होते. व्हिनिसियसने संधी पाहिली आणि गोलच्या अगदी समोर रिचार्लिसनच्या क्रॉसमध्ये हेड केले. रिचार्लिसनने चेंडूवर उत्कृष्ट नियंत्रण दाखवत एक्रोबॅटिक गोल केला.

रिचार्लिसन संपूर्ण सामन्यात सुरेख फॉर्ममध्ये दिसत होता. त्याचवेळी व्हिनिसियस ज्युनियर, नेमार आणि राफिन्हा यांनीही चमकदार खेळ केला. ब्राझीलने संपूर्ण सामन्यात २२ शॉट्स घेतले, त्यापैकी ८ लक्ष्यावर होते. त्याच वेळी, सर्बियाला सामन्यात केवळ ५ शॉट्स घेता आले. परंतु ब्राझीलच्या बचाव फळीसमोर एकही शॉट लक्ष्यावर जावू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here