Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीहोय, मी कंत्राटी मुख्यमंत्री!

होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री!

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दार, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणाऱ्या विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं, राज्याला पुढे नेण्याचं कंत्राट घेतलं आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

राज्यात नाट्यमय घडामोडी घडून सत्तांतर झाल्यानंतर होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. काल तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधी आमदारांमध्ये हमरीतुमरी झाली. या सर्वांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातून प्रत्युत्तर दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत काही विधान केले म्हणून त्यांना थेट जेवणावरून उचलून तुरुंगात टाकले होते. कशासाठी तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला म्हणून. पण आम्ही घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे बहुमत सिद्ध करून पदावर बसलोय. आम्ही कायद्याविरुद्ध कुठलंही पाऊल उचलणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, मी लोकांमध्ये मिसळून त्यांचं दु:ख दूर करण्याचं कंत्राट घेतलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाकी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लगावला. काल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता.

यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथे बहुमत सिद्ध करून बसलो आहोत. उगाच बसलो नाहीत. नाहीतर न्यायालयाने आम्हाला काढून टाकले असते. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी नाही केली. बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस, राष्ट्रवादी आमचे शत्रू आहेत. त्यांना कधी जवळ करायचं नाही. त्यांना जवळ करायची वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाशी गद्दारी केली असती तर आमच्या स्वागतासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा थांबले असते का, आमची भूमिका राज्यातील जनतेने मान्य केली आहे, सरनाईक यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही खुद्दार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षाने मुद्दे मांडायला हवेत. राज्याच्या हिताचे मुद्दे मांडले पाहिजेत. आता विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यामुळे वैचारिक दिवाळखोरीतून केवळ हिणवणे असंच सुरू आहे. पण आम्ही त्यावर कामाने उत्तर देणार. प्रत्येकाने आपली मर्यादा सांभाळली पाहिजे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी चारोळीच्या माध्यमातून विरोधकांना खोचक टोला लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -