Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडी'विधवा' ऐवजी 'गंगा भागिरथी' या शब्दाला महिला संघटनांचा आक्षेप

‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाला महिला संघटनांचा आक्षेप

विधवा महिलांना यापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करण्याच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना

मुंबई : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र, तसा उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे.

समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अपंग’ ऐवजी ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग रुढ केला. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. याच धर्तीवर राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असा आदेश लोढा यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे.

महिला आयोगाकडून विधवा महिलांच्या नावाविषयी काही सूचना आल्या होत्या. ज्या सूचना आल्या होत्या त्यापैकी एक सूचना अशी होती की, महाराष्ट्रात महिलांसाठी गंगा भागिरथी हे नाव प्रचलित आहे. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. सध्या हा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी हा प्रस्ताव पाठवल्याचे मंगलप्रसाद लोढा म्हणाले.

हे पण वाचा : पुरुषाची बायको जाते तेव्हा तुम्ही काही लावता का?

मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या फक्त प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याची सूचना प्रधान सचिवांना केली आहे. मात्र चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, विधवा महिलांचा गंगा भागिरथी (गं. भा.) असा उल्लेख करून त्यांची समाजात ओळख करून देण्यामागे उद्देश काय आहे? सरकारी योजनेचा लाभ मिळणार असेल तर तसा उल्लेख एक वेळ समजू शकले असते. केवळ प्रसिद्धीसाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. मंत्र्यांनी महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असे मत जनवादी महिला संघटना आणि घरेलू कामगार संघटना अध्यक्षा किरण मोघे यांनी व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -