Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबईत राष्ट्रवादीचा करिष्मा का चालत नाही?

मुंबईत राष्ट्रवादीचा करिष्मा का चालत नाही?

पडघम : सुवर्णा दुसाने

महाराष्ट्रातील एक बलाढ्य नेता म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं. शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला नुकतीच २२ वर्षं पूर्ण झाली. देवेंद्र फडणवीसांच्या युती शासनाची ५ वर्षांची सत्ता वगळली, तर इतर सर्व वेळ या राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत सहभाग घेतला आहे आणि ही सत्ता म्हणजे केवळ राज्यातलीच सत्ता नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार संस्था, पतपेढ्या, शैक्षणिक संस्था असे सत्तेचे भलं मोठं साम्राज्य शरद पवार यांनी उभं केले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मराठ्यांचा पक्ष म्हणूनही पाहिलं गेलं. राष्ट्रवादीने स्वतःला केवळ ग्रामीण महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं, असंही म्हटलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ वर्षांच्या कालावधीत लोकसभेच्या ५ निवडणुका झाल्या. पण मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील हे एकमेव खासदार २००९ साली निवडून आले. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर मुसा पटेल, सचिन अहीर, नवाब मलिक आणि संजय दिना पाटील हे आमदार म्हणून मुंबईतून निवडून आले.

मायानगरी असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. मुंबई ही व्यापार, उद्योगधंदे, चित्रपट निर्मिती अशा सगळ्याच क्षेत्रांत आघाडीवर आहे. म्हणूनच ‘मुंबई मेरी जान’ असे म्हणतात. सगळ्यांना आपलीशी वाटणाऱ्या मुंबईवर आपली सत्ता असावी, ही सर्व राजकीय पक्षांची इच्छा असते. कारण मुंबईत देश-विदेशातील राजकीय पाहुणे येत असतात, त्यांचे अधिकृतपणे स्वागत करण्याचा मान मुंबईच्या महापौरांचा असतो. त्याचप्रमाणे अनेक उद्योगपतींची ऊठबस मुंबईत सातत्याने होत असते. अशा लोकांशी चर्चा करण्याची संधी मुंबईच्या महापौरांना मिळत असते. एकूणच मुंबई मनपाची सत्ता आणि मुंबईचा महापौर ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. शिवाय, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ४० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे मुंबईच्या तिजोरीची चावी आपल्या हाती असावी, अशी इच्छा सगळ्याच राजकीय पक्षांना असते.

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या २-३ महिन्यांवर आली आहे. आगामी निवडणुकीत मुंबईकर कोणाला पसंती देतील? कोणाच्या हाती मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या जाऊ शकतात, याबाबत नासा ग्लोबल मीडिया आणि श्री रिसर्च मीडिया यांनी संयुक्तपणे राजकीय सर्व्हे केला. शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या सर्व्हेत मुंबईकरांच्या मनाचा कौल यावेळी बदलला असल्याचे निदर्शनास आले. शिवसेनेला मागे टाकीत ९३ जागांवर विजय मिळवीत, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, तर गेली २५ वर्षे मुंबईवर एकहाती सत्ता राबविणारी शिवसेना ८५ जागांवर विजय मिळवीत दुसऱ्या स्थानी राहील, असे दिसते. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असू शकतो.

मात्र राज्यातील सद्य परिस्थितीप्रमाणे मुंबई महापालिकेत आघाडीचा प्रयोग होऊ शकेल आणि भाजपच्या हाती सत्ता जाण्याऐवजी महाविकास आघाडी मुंबईवर सत्ता करेल. कारण भाजप शिवसेनेनंतर काँग्रेस पक्षाला २८, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७, मनसेला ४, सपाला ६, एमआयएमला २, अभासेला १ आणि इतर १ मुंबई महापालिकेत संख्याबळ असेल, असे या सर्व्हेतून पुढे आले आहे. मुंबईची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पालिका आपल्या ताब्यात राहावी, यासाठी शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेऊ शकते. कारण महाविकास आघाडीचे किंग मेकर हे शरद पवार आहेत आणि मुंबईची सत्ता ते राजकीय विरोधकांच्या हाती सहजासहजी जाऊ देणार नाहीत, असे दिसते.

शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाबद्दल सर्वत्र चर्चा होते. राज्यासह देशातही राजकीय समीकरणे जुळविण्यात शरद पवारांचा हातखंडा असल्याचे बोलले जाते. त्यांच्या राजकीय समयसूचकतेबद्दल बोलबाला होताना दिसतो. वयाच्या ८०व्या वर्षांतही सातत्याने ते दौरे करतात. त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. म्हणूनच त्यांच्या हाकेला धावून येणारा एक वर्ग आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी राजकीय चित्र पालटवल्याचे अनेक जण सांगतात. एकदंरच, राजकीय समीकरणे जुळविण्यात शरद पवार माहीर असल्याचे मानले जाते. मात्र असे असूनही मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा करिष्मा कधी फारसा चालला नाही. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त ७ जागांवर विजय मिळेल, असे दिसते.

या आधीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत मोठं यश मिळविल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरची मुंबई मनपाची पहिली निवडणूक २००२ साली झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ जागा जिंकल्या, तर २००७च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला १४ जागा जिंकता आल्या. मुंबई महापालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत ६.५६ टक्के मते घेत राष्ट्रवादीला १३ जागा मिळाल्या, तर २०१७च्या निवडणुकीत ४.९१ टक्के मते घेत राष्ट्रवादीला ९ जागा मिळाल्या. म्हणजेच, मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेच्या जवळपास अद्याप पोहोचू शकलेला नाही.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून अनेक भागांत पक्षाने आपला जम बसविला. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला. या भागात शरद पवारांना मानणारा आणि शरद पवारांवर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. जो त्यांना साथ देत आला. याच भागातून मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि डबेवाले मुंबईत आले आहेत, मात्र असे असूनही मुंबईतील कामगारवर्गाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. किंबहुना महाराष्ट्राच्या इतर भागात जशी राष्ट्रवादीची बांधणी केली, तशी ती मुंबईत केल्याचे दिसत नाही. सचिन अहिर आणि नवाब मलिक या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचा चेहरा मुंबईत दिसला नाही.

सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे स्वतःच्या प्रतिभेवर निवडून येऊ शकेल, असा नवाब मलिक सोडून इतर कोणी राष्ट्रवादीचा नेता नजरेच्या टप्प्यात येत नाही. त्याचप्रमाणे शरद पवारांनी किंवा राष्ट्रवादीच्या इतर बड्या नेत्यांनी मुंबईत पक्ष बांधणीवर भर दिल्याचे जाणवत नाही. कदाचित शिवसेनेला मुंबईत मोकळीक देऊन त्या बदल्यात पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद वाढविण्यावर राष्ट्रवादीने जोर दिला असावा, असे वाटते.

जाणता राजा म्हणून नावाजलेल्या, राज्यात प्रभावी ठरलेल्या आणि देश पातळीवर दखलपात्र असलेल्या शरद पवार यांचे सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध असल्याचे दिसते. राज्य आणि देशपातळीवरील अनेक राजकीय घडामोडीत शरद पवार यांचे मत विचारात घेतलं जाते. अनेक घडामोडीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शरद पवारांचा सहभाग असल्याचे मानतात. पंतप्रधानपदासाठी पात्र उमेदवार असाही शरद पवार यांचा उल्लेख होतो. त्याच पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आपला करिष्मा दाखवू शकलेली नाही, ही वस्तुस्थिती यानिमित्ताने पुढे आली.
(लेखिका, नासा ग्लोबल मीडियाच्या संस्थापक आहेत.)
nassaglobal21@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -