Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेशीळ डायघर दरवर्षी पाण्यात का बुडते?

शीळ डायघर दरवर्षी पाण्यात का बुडते?

नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडवून भकास विकास कोणाच्या मुळावर?

अतुल जाधव

ठाणे : मागील काही वर्षांपासून शीळ डायघर परिसरात पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. चार ते पाच वर्षांपासून पुराचे चक्र सुरूच आहे, परंतु पुराचा तडाखा अनुभवलेल्या प्रशासनाने आणि बॅनर छाप राजकारण्यांनी पुरापासून कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. शीळगाव आणि महापे या ठिकाणी नैसर्गिक डोंगररांगा असून त्या वनराईनी समृद्ध आहेत. या डोंगर उतारावरून वाहून येणारे पाणी नैसर्गिक पद्धतीने खाडीत सोडण्याचे काम या परीसरात असलेले नैसर्गिक नाले करत असतात.परंतु महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील नैसर्गिक नाल्यांचा गळा घोटला जात असून नाल्यामध्ये अतिक्रमणे निर्माण करून नाले नष्ट करण्यात येत आहेत. परिणामी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थेट मानवाच्या वस्तीत जागा दिसेल त्या ठिकाणी घुसतो आणि डवले गाव आणि शिळफाटा परिसर जलमय होतो.

या ठिकाणी पाणी साचल्यावर त्याचा थेट परिणाम ठाणे नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहराच्या वाहतुकीवर होतो. ठाणे शहरातील शीळ फाटा परिसर वाहतुकीचे केंद्रबिंदू समजले जाते. कायम वाहतुकीने गजबजलेला हा परीसर रस्ते मार्गाने अनेक शहरांना जोडतो. या परिसरात मागिल काही वर्षापासून मोठमोठी टोलेजंग गृहनिर्माण ईमारती निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे या परिसरात असलेल्या मोकळ्या जागांवर चाळी, झोपड्या आणि गोडावून मालकांनी कब्जा केला आहे. परिणामी नैसर्गिक प्रवाह अडवले गेले आहेत. शिळफाटा ते भारत गियर्सपर्यंत असलेल्या नैसर्गिक नाल्यांना केव्हाच मूठमाती देण्यात आली आहे. नैसर्गिक नाले डेंब्रिज माती सिमेंटने नष्ट करण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेल्या स्थानिक व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार २०१० नंतर या ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्याचे काम मोठ्याप्रमाणावर सुरू आहे.

शीळ फाटा रोड वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता आहे. पावसाळ्यात हा रस्ता पुराखाली गेल्यानंतर वाहतुकीचे तीन तेरा होतात. या ठिकाणी असलेल्या काही सामाजिक कार्यकर्तां प्रमाणे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु भूमाफियांकडून त्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. महापालिकेत तक्रारी देऊन देखील त्याचा काहीच प्रभाव पडत नसल्यामुळे पाणी नेमके कुठे मुरते याचा शोध संबंधीत यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. पालिका त्याचप्रमाणे संबंधित शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे शीळ डायघर परिसर पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -