Thursday, May 2, 2024
Homeराशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. ११ ते १८ फेब्रुवारी २०२३

अनुकूल वातावरणाचा लाभ
मेष – सदरील सप्ताहात आपण अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. रोजची नियोजित कामे सहजी होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. पूर्वी केलेले नियोजन सफल झालेले अनुभवता येईल. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. उत्साहाने आपल्या पुढील कामे आपण पूर्ण करू शकाल. कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळतील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी हा कालावधी उत्तम राहील. दीर्घकाळ प्रलंबित असलेली जमीन-जुमला तसेच काही संपत्तीविषयी असलेली कार्य गतिशील होतील. ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील. सरकारी स्वरूपाची कामे विनाविलंब होतील.

कामे यशस्वी होतील
वृषभ – समाजातील परिचित, अपरिचित, प्रतिष्ठित लोकांपासून लाभ मिळेल. त्यांच्या सहवासात सहमार्गदर्शन मिळेल. वेळप्रसंगी मदतही मिळू शकते. एखाद्या समारंभात मानाचे स्थान मिळू शकेल. सामाजिक कार्यातील रस वाढेल. हाती घेतलेली बहुतेक कामे यशस्वी होतील, मनाप्रमाणे पार पडतील, आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी तसेच हाताखालील लोकांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी ठराल. इतरांना मार्गदर्शन करू शकाल. आपल्या कार्याचे कौतुक होईल. मात्र आत्मविश्वासाने आर्थिक व्यवहारात अव्यवहार्य धाडस करणे टाळावे. परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.
उत्साहात भर पडेल
मिथुन –सप्ताहाच्या सुरुवातीस जरा सावध राहणे गरजेचे ठरेल. विशेषतः लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा तसेच आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे लक्षपूर्वक हाताळणे अथवा ठेवणे गरजेचे राहील. तसेच आपले वाहनसुद्धा सुरक्षित जागी पार्क करा. चोरीची शक्यता नाकारता येत नाही. कुटुंब, परिवारात वातावरण सर्वसामान्य राहील. कुटुंबातील कामासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो. उत्तरार्धात आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. पूर्वी केलेले नियोजन यशस्वी झालेले बघून उत्साहात भर पडेल. जुनी येणी वसूल होतील.
कार्यात गतिमानता येईल
कर्क – या आठवड्यात सुरुवातीला जरी प्रतिकूलता जाणवली तरी त्या प्रतिकूलतेवर ती आपल्याला मात करून पुढे जावे लागेल. आपले निर्णय योग्य ठरतील. वेळप्रसंगी इतरांचा सल्ला अथवा मार्गदर्शन उपयोगी पडेल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य द्या. कोणतेही लहान-मोठे आर्थिकविषयक निर्णय घेताना जागरूक राहणे गरजेचे राहील. सतर्क राहा. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहून आपला आत्मविश्वास वाढेल. आपल्या कार्यात गतिमानता येईल. कार्यक्षेत्रात नव्या योजना, नियोजन करणे आपल्या कार्यासाठी पोषक ठरेल. नोकरी-व्यवसायात अनुकूलता लाभेल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल.

व्यवसाय-धंद्यात यश
सिंह – आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. इतरांच्या म्हणण्याला अथवा मताला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल. व्यवसाय-धंद्यामध्ये अपेक्षित यश मिळेल. काही वेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी होत नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास युक्तीने मार्ग सापडेल. इतरांना समजून घ्या. आपल्या कामकाजात अपेक्षित प्रगती साधण्यासाठी अचूकता व सातत्य महत्त्वाचे ठरेल. वैवाहिक जीवनात किरकोळ कारणांवरून वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
प्रवास यशस्वी होतील
कन्या – नोकरी-धंदा अथवा व्यवसायानिमित्त्य दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक राहील. वाहतुकीचे नियम पाळणे स्वतःच्या हिताचे ठरेल. प्रवास यशस्वी होतील. प्रवासात काही नवीन ओळखी होतील. त्या ओळखीमुळे आपल्याला भविष्यात चांगला फायदा होऊ शकेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात मात्र काही वेळा आपल्या नियोजनात बदल करावा लागेल. कार्यक्षेत्र वाढल्यामुळे धावपळ करावी लागेल. काही नवीन करार-मदार होऊ शकतात.
अतिआत्मविश्वास नको
तूळ – आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला काही नवीन संधी मिळतील, त्याचा उपयोग करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवा. आपल्या कामात चालढकल करू नका अथवा इतरांवर अवलंबून राहणे धाडसाचे ठरेल तसेच अतिआत्मविश्वास नको. स्वतःची कामे स्वतःच करा. मैत्रीमध्ये व्यवहार किंवा व्यवहारात मैत्री यापासून दूर राहा. भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. त्यासाठी शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरेल. आर्थिक पक्ष मजबूत राहील. मनासारखा खर्च कराल. कुटुंबासाठी काही नवीन खरेदी करू शकाल.
सावध राहा
वृश्चिक – या आठवड्यात आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडल्यामुळे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याचे प्रश्न अचानक निर्माण होऊ शकतात. स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीचे काम करावे लागेल. कामाचा ताण जाणवू शकतो. धावपळीमध्ये अथवा घाई-गडबडीमध्ये कोणतेही लहान-मोठे निर्णय घेऊ नका. नोकरीधंद्यात आपण घेतलेल्या निर्णयांचे पडसाद उमटतील. शांतपणे विचार करा. एकाग्रतेने निर्णय घेणे आवश्यक ठरेल. स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक. सावध राहणे आवश्यक.
सहकार्य व आशीर्वाद लाभतील
धनु – या सप्ताहात काही मनासारख्या घटना घडल्यामुळे उत्सव आणि आनंदात भर पडेल. कुटुंब-परिवार मुला-मुलींकडून सुवार्ता मिळतील. त्यांचे नोकरी संबंधित प्रश्न मिटतील. नोकरीसंबंधित मुलाखती सफल होतील तसेच उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. कुटुंब व गुरुजनांचे सहकार्य व आशीर्वाद लाभतील. परदेशगमनाचे नियोजन होऊ शकते. नोकरी-व्यवसाय-धंद्यात आपण पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्षात सफल होत असलेले बघून समाधानी राहाल. आपले नियोजन व्यवसाय-धंद्यासाठी पोषक ठरलेले पाहून उत्साहात भर पडेल तसेच फायद्याचे सौदे हाती येतील. जुनी येणी वसूल होतील.
कार्यरत राहा
मकर – आपल्या अवतीभवती वेगवान घटना घडू शकतात. त्यामुळे प्रत्येक कार्य लक्षपूर्वक करणे गरजेचे ठरेल. आपल्याला झेपतील इतक्याच जबाबदाऱ्या स्वीकारणे अपरिहार्य ठरेल. आपण जी कामे पूर्ण करू शकाल. त्याविषयी कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल. अतिआत्मविश्वासाने घात होऊ शकतो. सर्व प्रकारचे लहान-मोठे आर्थिक व्यवहार जपून करणे गरजेचे ठरेल. कोणावरही अतिविश्वास ठेवणे घातक ठरू शकते. नोकरी-व्यवसाय- धंद्यात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरू शकतो. महत्त्वाच्या कामांबद्दल अगोदरच घोषणा करू नका. पहिले कार्यमग्न राहा. कुटुंब-परिवारात तसेच कार्यक्षेत्रात काही लहान-मोठ्या चुका घडण्याची शक्यता आहे.
फायद्याचे सौदे हाती येतील
कुंभ – आपल्याला या आठवड्यात भाग्याची उत्तम साथ राहील. कुटुंब परिवारातील सदस्यांचे तसेच आपल्या जीवनसाथीचे वाढते सहकार्य मिळेल. कुटुंबातील मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर वार्ता कानावर आल्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साहजनक राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील काही वेळा अचानक धनलाभाचे योग घटित होत आहेत. मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. लहान-मोठ्या कामानिमित्त अथवा पर्यटनामुळे प्रवास घडू शकतात. प्रवास कार्यसिद्ध राहतील. नवीन खरेदी करू शकाल. व्यवसाय-धंद्यात काही फायद्याचे सौदे हाती येतील.
निर्णय महत्त्वाचे ठरतील
मीन – आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो. जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. कुटुंब-परिवार आतही काही जास्तीची कामे करणे गरजेचे ठरेल. त्यामुळे धावपळ आणि दगदग करावी लागेल. त्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक ठरेल. शांतपणे विचार करून आपल्या पुढील कार्य पूर्ण करा. नियोजनबद्धता व शिस्त यांचे पालन फायदेशीर ठरेल. आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीच्या ठिकाणी राजकारण तसेच गटबाजीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला राग येण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु आपल्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक राहील. परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -