Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखWaste management : कचरा नावाचा ‘खतरा’

Waste management : कचरा नावाचा ‘खतरा’

  • रश्मी भातखळकर : केशव सृष्टी विश्वस्त

माणसांची वस्ती तेथे प्रश्न, हे गणित कधीच न सुटणारे असते. माणूस जितक्या गतीने समस्या निर्माण करतो, त्यापेक्षा कितीतरी धीम्या गतीने त्याचे निवारण करण्यासाठी पावले उचलतो. जेव्हा सार्वजनिक समस्या या मोठ्या वसाहतींच्या संदर्भात असतात आणि त्याचे निवारण जर योग्य वेळेत झाले नाही तर त्याचे परिणामही तितक्याच मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. योग्य निवारणासाठी आर्थिक घटकांबरोबर इच्छाशक्ती, कार्यक्षमता आणि नियोजन हे घटकही खूप महत्त्वाचे असतात. मुंबईसारख्या ‘श्रीमंत’ महापालिकेकडून नागरी प्रश्न सोडवणे फारसे कठीण नाही. मात्र याबाबत असंवेदनशीलता, इच्छाशक्तीचा अभाव, अकार्यक्षमता, खोल नियोजनाचा अभाव, गैर ठेकेदाराची निवड, सत्ताधारी आणि विरोधकांमधील भांडणे, गैरव्यवहार यामुळे समस्या तीव्र बनत असल्याचे दिसून येते.

शहरात निर्माण होणारा कचरा हा विषय देशातील इंदूर, बंगळूरुसारख्या शहरांमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे हाताळला जाऊ शकतो, तर तो मुंबई शहरात का हाताळला जाऊ नये? या विषयावर अजून किती वर्षं पालिका संशोधन करणार? हा प्रश्न आहे. आतापर्यंत अनेक समित्या नेमल्या. परदेशी अभ्यास दौरे झाले, खर्चही मोठ्या प्रमाणात झाला. इतकेच नाही तर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर कोट्यवधींचा खर्च केला जातोच आहे. मात्र प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो मुळासकट बाजूला करण्यासाठी काय केले? हा खरा प्रश्न आहे. यामध्ये प्रशासन जितके दोषी असते तितकेच कचरा करणारे नागरिकही दोषी आहेतच. संत गाडगेबाबा यांनी हातात खराटा घेऊन गावे स्वच्छ केली. स्वच्छतेचा संदेश दिला. गावखेड्यातील लोकांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले. अनेक गावे आज स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श ठरली असताना सुशिक्षित समाज राहत असलेल्या मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत याकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही ?

झोपडपट्टी, चाळ, इमारतींपासून सर्वस्तरीय हॉटेल्स, फूड मॉल, रस्त्यावरील फूड स्टॉल्स, कॅन्टीन्स, हॉस्पिटल्स, सरकारी आस्थापने, सिनेमागृहे येथून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याबाबत कोणासही सोयर-सुतक नाही. कचरा टाकायला कोणतेही सामाजिक बंधन नाही. हाताला शिस्तच नाही, त्यामुळे कचरा कोठेही पडलेला दिसून येत असतो. महानगरपालिका जेव्हा कचरा विषय घेऊन एखादी योजना राबविण्याचा विचार करते, तेव्हा खरं तर लोकांच्या सवयी काय आहेत? मानसिकता काय आहे? हे लक्षात घेऊन जर ती अमलात आणली तर प्रश्न सोडविणे अधिक सोपे जाईल. उदा. बहुसंख्य लोकवस्तीमध्ये ओला-सुका कचरा वेगळा करीत नाहीत. केला तरी तो पुन्हा वाहून नेणाऱ्या गाड्यांमध्ये तो एकत्र करून टाकला जातो. अशावेळी फक्त सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था ठेवावी म्हणजे आपोआप सुका कचरा वेगळा ठेवला जाईल. प्रगत राष्ट्रांमध्ये केवळ माणसालाच नव्हे; तर प्राण्यांनाही अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे तिथली सार्वजनिक व्यवस्था कुणाचीही मर्जी राखण्यासाठी काम करत नाही. व्यवस्था उभी करताना केवळ आणि केवळ माणूस हा केंद्रबिंदू असतो. त्याची सुरक्षा, त्याची सोय यापेक्षा बाकी कुणालाच महत्त्व नसते. यामध्ये कोणी आड आले, तर त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागते. पण इथे नेमके उलटे घडते. एखादा कोणी प्रश्न सोडविण्यासाठी काही करायला जातो, तर त्यालाच खूप मोठी किंमत मोजावी लागते, दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे.

केंद्र सरकार २०१४ पासून स्वच्छता अभियान खूप मोठ्या प्रमाणावर चालवत आहे. पण कचरा या प्रश्नाचा आकार बघता मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न खूप तोकडे पडतात. गेल्या काही पावसाळ्यात घडणाऱ्या गंभीर घटना लक्षात घेऊन आपापसातले हेवे-दावे बाजूला ठेवून इच्छाशक्ती, कार्यक्षमता, नियोजन हे घटक प्रबळ करून प्रामाणिकपणे योजना अमलात आणण्याचा विचार आजच्या पर्यावरण दिनानिमित्त केला, तर कचरा हा खतरा राहणार नाही. एवढे मात्र नक्की.

ओला कचरा संदर्भातले काही उपाय :
  • जसे प्रत्येक वस्तीत चक्की असते, तसे सामूहिक high HP motor चे क्रशर उभे करून कचऱ्याचा चोथा हा खत बनविणाऱ्या संस्थांना किंवा कंपन्यांना उचलण्याची मुभा देता येईल. लोकसंख्येप्रमाणे वेगवेगळ्या साईजचे क्रशर लावून ते चालवणे, मेन्टेन करणे हे जर यशस्वी झाले तर हा उपाय अनेक राज्यांमध्ये वापरला जाईल.
  • इमारतींमधील क्रशर हे सेप्टिक टँकवर पण बसवता येईल, जेणेकरून त्याची स्लरी डायरेक्ट
    टँकमध्येच जाईल.
  • नाल्यांवर दोन्ही बाजूने चढत्या दिशेने ४५ अंशांच्या कोनात जाळीचे कव्हरिंग केले, तर कचरा टाकला तरी तो घरंगळत खाली येईल. त्यामुळे नाले तुंबणारही नाही आणि खाली आलेला कचरा शेवटी कधी ना कधी उचलला जाईलच. पण नाल्यांवर सपाट कव्हर केले तर त्यावर साचलेला कचरा कधीच उचलला जाणार नाही. वजनाने जाळी तुटल्यास पुन्हा नाले कचऱ्याने भरतील.
  • मोबाइल क्रशरच्या गाड्या पण गरजेप्रमाणे आपल्या वस्तीपुरता फिरविल्या आणि स्लरी खत बनवणाऱ्यांना दिली तरी काम साध्य होईल.

प्रामाणिकपणे प्रश्न सोडविण्याचा विचार केला, तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच. या विषयाचा अभ्यास असणाऱ्या अजून अनेकांकडून कल्पना-सूचना मागविल्या तर अनेक उपाय मिळण्यास मदत होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -