Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यKonkan Agricultural University : कोकण कृषी विद्यापीठात मालवणी कुलगुरू...

Konkan Agricultural University : कोकण कृषी विद्यापीठात मालवणी कुलगुरू…

  • माझे कोकण : संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात शेतीला प्राधान्य देणं, कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करणं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि शेतीच्या प्रगतीसाठी विद्यापीठातून शिक्षण घेतलेले प्रगतशील शेतकरी समाजव्यवस्थेत असावेत, असा मूळ उद्देश असावा. स्व. बाळासाहेब सावंत हे कोकणचे नेते, लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. बाळासाहेब सावंत यांच्याच नावाने कोकणात कृषी विद्यापीठ स्थापन झाले. कोकणच्या कृषी विद्यापीठातून कोकणातील शेतकऱ्यांना किती मार्गदर्शन होते आणि झाले, हा वेगळ्या चर्चेचा आणि संशोधनाचा जरूर विषय असेलही; परंतु आज मात्र कोकणच्या कुलगुरूपदी डॉ. संजय भावे यांची नियुक्ती झाली, त्याचा निश्चितच आनंद आणि अभिमान आहे. त्यातही डॉ. संजय भावे कणकवलीचे. मालवणी मुलखातली परिचयाची एखादी व्यक्ती स्वत:च्या कर्तृत्वाने एखाद्या उच्च पदावर विराजमान होते, तेव्हा निश्चितच त्याचा आनंद माझ्यासारख्याला झाल्याशिवाय राहात नाही. कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. भावे यांचे अभिनंदन!

दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात शिकलेला एक विद्यार्थी त्याच विद्यापीठाचा कुलगुरू होतो, असे क्षण फार मोजक्या लोकांच्या नशिबी येतात. त्यातले एक भाग्यवान डॉ. संजय भावे आहेत. यापूर्वीचे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत हे देखील मूळ गांव त्यांचं तरंदळे, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग आहे. त्यांचं शिक्षण नाशिकला झालेलं. कोकण कृषी विद्यापीठात खरंतर कोकणातीलच एका कुलगुरूपदी वर्णी लागण्याचा योग तब्बल बारा वर्षांनंतर आला आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोकणातील व्यक्तीची निवड झाली आहे. यापूर्वी ते रत्नागिरीचे डॉ. श्रीरंग कद्रेकर, दापोलीचे डॉ. विजय मेहता, डॉ. सावंत यांनी कुलगुरूपद भूषविले आहे. कोकण कृषी विद्यापीठाने काजू, भात, आंबा यावर संशोधन केले आहे. यातील काजूवरील संशोधनाने शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झाला आहे. कोकणातील हापूस आंब्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भाने अजूनही संशोधन झाले पाहिजे. आंब्यात होणाऱ्या ‘साका’ याबाबतीत कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या कार्यकाळात काही नवीन संशोधन आणि उपाययोजना होईल, अशी अपेक्षा आहे.

कोकणातील तरूण अजूनही म्हणावा तसा शेती क्षेत्रात रमत नाही. कोकणातील तरुण कोकणातच थांबला पाहिजे. यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येईल. जेणेकरून मिळणारा नफा अधिक असेल, असं कृषी संशोधन झालं पाहिजे. सर्वकाही जर निसर्गावरच अवलंबून असेल असं मानून न चालता निसर्गावर मात न करता त्याचा सदुपयोग करून काही व्हायला हवं.

आज जागतिक पातळीवर भरड धान्याचा विषय ऐरणीवर आहे. या भरड धान्य लागवडीकरिता कोकणात आजही भरडी जमीन मोकळी शिल्लक आहे; परंतु ते करण्यासाठी जी माणसं शेतात उतरायला हवीत असं वातावरण या कोकणात तयार करण्याचा खरंतर फार मोठं आव्हान आहे.

अलीकडे कलिंगड, काजू बागायतीत काही तरुण उतरले आहेत; परंतु कलिंगडाला फळमाशींचा प्रादुर्भाव झाला की, कलिंगडाची लागवड करून काही नवीन करण्याचा प्रयत्न करणारा तरुण शेतकरी कोलमडून जातो. त्याच शेतीतून चार पैसे मिळविण्याचे आर्थिक गणित विस्कळीत होते. असे अनेक शेतीशी संबंधित कोकणातील प्रश्न आहेत. अर्थात या सर्व प्रश्नांची पूर्ण जाण आणि माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना आहे. यामुळे कुलगुरू डॉ. भावे यांच्या कार्यकाळात कोकण कृषी विद्यापीठातून निश्चितच सकारात्मक काही चांगलं घडेल, याची अपेक्षा कोकणवासीयांनी करायला काहीच हरकत नाही.

डॉ. संजय भावे यांचे बालपण आणि शालेय शिक्षण कणकवलीत झाले आहे. यामुळे मालवणी मुलखाची आणि विद्यापीठात शिक्षण घेताना आणि त्यानंतरच्या नोकरीच्या माध्यमातून कोकणी माणूस त्याची मानसिकता, त्याची चिकित्सक वृत्ती, त्याचा इरसालपणा या सर्वांविषयी डॉ. भावे यांना पूर्ण अनुभव आहेच. यामुळेच या सर्वातून मार्ग काढत कोकण कृषी विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालणार, विद्यापीठाची शान वाढवणार. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल, कोकणातील शेतकरी आर्थिक सक्षम होईल,
असे काम डॉ. संजय भावे यांच्या हातून घडावे. कोकणाची एक नवी ओळख निर्माण व्हावी. एवढं माइलस्टोन ठरेल असं काम उभं राहावं, एवढीच कोकणवासीयांची अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -