Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यवर्धा, अकोला, अमरावतीचा कौल कुणाला?

वर्धा, अकोला, अमरावतीचा कौल कुणाला?

विदर्भ वार्तापत्र: नरेंद्र वैरागडे

अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशीम, वर्धा, बुलढाणा या लोकसभा मतदारसंघांत २६ एप्रिलला मतदान होत आहे. या पाचही मतदारसंघांत चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत.

वर्धा मतदारसंघात तडस विरुद्ध काळे!
सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरात घुमू लागले आहेत. रस्त्याने जाणारे भोंगे ‘विजयी करा’चे हाकारे देत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांना विजयाचा आत्मविश्वास आहे. त्याचवेळी भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांनाही आपणच मोदींच्या करिष्म्यावर तिसऱ्यांदा विजयी होणार, असा विश्वास आहे. मोदींचा करिष्मा यंदाही चालणारच असा ठाम विश्वास तडस यांना आहे. त्यांच्या मागे मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. शिवाय मोठा जनसंपर्क असलेले असे हे नेतृत्व आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असले तरी त्यांना काँग्रेसच्या कार्यनियोजन निवडणूक जाहीरनाम्याचा दिलासा वाटतो. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे मामा माजी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आहे. अनिल देशमुख हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचा जिल्ह्यातला सार्वजनिक संपर्क मर्यादितच होता. अमर काळे हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

वर्धा जिल्ह्यातील जिल्हास्तरीय नेतृत्वाचा विचार करता, मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या स्तरावरील नेतृत्व उभे करण्यास सर्वच राजकीय पक्षांचे अपयश ठळकपणे दिसते. सहकार महर्षी बापूराव देशमुख, बन्सिलाल पाटणी, प्रभा राव यांच्यानंतर जिल्हास्तरावरील नेतृत्व उभे करण्यात कोणत्याही राजकीय पक्षाला यश आले नाही, ही सर्वपक्षीय शोकांतिकाच आहे.

बुलढाणात बहुरंगी लढत
बुलढाणा मतदारसंघात २१ उमेदवार असून यावेळी पश्चिम विदर्भातील बहुरंगी लढत असणार आहे. बुलढाण्याची परंपरागत जागा शिवसेनेकडे कायम ठेवण्याचे आव्हान खा. प्रतापराव जाधव यांच्यासमोर आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे प्रा. नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवारी दाखल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर असे तुल्यबळ उमेदवारांनी या निवडणुकीत रंगत वाढविली आहे. अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या उमेदवारीने ही निवडणूक चर्चेत आली. एकंदरीत घाटाखाली आणि घाटाच्या वर असे विभाजन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात सर्वसमावेशक, चौफेर सर्वाधिक मते कोण घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आजघडीला या मतदारसंघात बहुरंगी व शेवटी चौरंगी लढत होणार असे दिसत आहे. प्रस्थापितांविरोधात मतविभाजनाचा धोका वाढलेला असताना खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर आपली जागा कायम ठेवण्याचे आव्हान आहे. शेतकऱ्यांचे भक्कम पाठबळ असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राजश्री पाटील की संजय देशमुख?
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच एकाच पक्षाच्या दोन गटांच्या उमेदवारांत यावेळी रंगतदार लढत होणार आहे. महायुतीतर्फे राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना फार आधीच पक्षाने उमेदवारी दिल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. नवा चेहरा म्हणून शिंदे सेनेकडून यवतमाळ माहेरघर असलेल्या राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजश्री पाटील यांचे नामांकन दाखल झाले. अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला राजश्री हेमंत पाटील यांना यवतमाळला उमेदवारी घोषित झाली. आता ठाकरे शिवसेनेचे माजी मंत्री संजय देशमुख आणि शिंदे सेनेच्या राजश्री पाटील या दोघांमध्ये सरळ लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला असला तरी त्यांचा अर्ज पडताळणीत बाद झाला. २०१४ मध्ये शिवसेनेकडून भावना गवळी आणि काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांच्यात लढत झाली.

भावना गवळी यांना ४ लाख ७६ हजार ९३० मते मिळाली होती, तर ॲड. मोघे यांना ३ लाख ८३ हजार ६३९ मते मिळाली होती. भावना गवळी ९३ हजार ९९१ मतांची आघाडी घेत विजयी झाल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेने पुन्हा भावना गवळी यांनाच उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भावना गवळी यांनी ५ लाख ४० हजार १०४ मते घेतली, तर माणिकराव ठाकरे यांनी ४ लाख २२ हजार ४९७ मते घेतली. गवळी यांनी काँग्रेसच्या ठाकरेंचा १ लाख १७ हजार ६०७ मताधिक्याने पराभव करीत विजय मिळविला. या दोन्ही निवडणुकांत महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती हे विशेष. यंदा या मतदारसंघात वंचितचा उमेदवार नाही. कारण त्यांचा अर्ज बाद झाला आहे. मागील निवडणुकीत वंचितने १ लाख मते घेतली होती. आता ही मते कोणाकडे जातात याकडे लक्ष लागले आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोडही रिंगणात आहेत. ते बहुजन समाज पार्टीकडून उभे आहेत. पण त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा जोर दिसत नाही.

अकोल्यात होणार तिरंगी लढत…
वाढत्या उन्हासोबतच दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम विदर्भात राजकीय वातावरण तापले आहे. या जागेसाठी भाजपा, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा परंपरागत तिरंगी लढत होणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर या तीनही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपाचे अनुप धोत्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने शक्तिप्रदर्शन करत करत जनतेचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अॅड. आंबेडकर यांनी विजय खेचून आणण्याची जिद्द ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. दुसरीकडे मोदी यांना पंतप्रधान करा या ध्येयाने प्रेरित प्रचारात महायुती मजबूत
दिसत आहे.

अमरावतीत राणा की वानखडे?
अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात नवनीत राणा यांच्याविरोधात इतर पक्ष असे समीकरण असले तरी खरी लढत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नवनीत राणा यांच्यामुळे गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ. यंदा राणा भाजपाच्या तिकिटावर या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. या मतदारसंघाचा विचार करता महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणातील अनेक मोठ्या नावांचा संबंध या मतदारसंघाशी आहे. त्यामुळे समृद्ध नेतृत्वाचा वारसा लाभलेला हा मतदारसंघ या निवडणुकीत कुणाच्या बाजूने झुकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र सध्या तरी राणा यांचे पारडे जड असल्याचे भाकीत जाणकारांकडून वर्तवले जात आहे. आनंदराव अडसूळ हे नवनीत राणा यांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे राणा यांना आणखी बळ मिळाले आहे. तसेच या मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचा प्रभाव पाहता त्याकडे कानाडोळा करता येणार नाही. अचलपूर आणि मेळघात अशा दोन विधानसभांमध्ये त्यांचे आमदार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -