Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलविनू आणि वाघोबा

विनू आणि वाघोबा

रमेश तांबे

संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला चालला होता. अशा अंधूक प्रकाशात, लांब लांब सावल्यात एका तळ्याच्या काठावर एक मुलगा बसला होता. कितीतरी वेळ झाला. अंधार पडू लागला. पाखरांचा किलबिलाट थांबला. झाडांनी माना टाकल्या. अशा एकांत ठिकाणी तो मुलगा तळ्याकाठी बसला होता.

तेवढ्यात माकडांचा आवाज आला. ची ची ची… असा त्यांनी गोंगाट केला. टिटवी जंगलची पोलीस धोक्याचा इशारा देऊन गेली. पण मुलगा मात्र शांत होता. त्याला जराही भीती वाटत नव्हती. मग हळूहळू आवाज आला पानांचा, कुणी जंगली प्राणी चालण्याचा. पक्ष्यांचा, माकडांचा आवाज एकदम बंद झाला. सगळीकडे शांतता पसरली. मुलाने पाहिले एक पट्टेरी वाघ त्याच्यासमोर जिभल्या चाटीत उभा होता. पण मुलगा घाबरला नाही अन् ओरडलादेखील नाही. ना तो पळाला, ना तो रडला. वाघाला आश्चर्यच वाटले. हे माणसाचं एवढंसं पोरगं आपल्याला कसं नाही घाबरलं. पळालं तर नाहीच, वर एकटक आपल्याकडंच बघतंय!

खरं तर वाघाला खूप भूक लागली होती. आजची मेजवानी खूपच भारी होती. वाघ मुलाकडे गेला अन् म्हणाला, “काय रे मुला, तुला माझी भीती नाही वाटत! मी मघापासून उभा आहे जिभल्या चाटत.” मुलगा पुन्हा एकटक वाघाकडे बघू लागला. आता मात्र वाघ गोंधळला. काय बरे करावे? तोडायचे का याचे लचके! मोठीच आहे मेजवानी, इथे होणार नाही वाटणी. पण वाघ चांगल्या मनाचा होता. त्याला वाटले आधी विचारूया तरी या मुलाला, काय झालं असं एकटं जंगलात बसायला. रात्र झाली. जावे आपल्या घरी आई-बाबा शोधत असतील दारी.

मुलगा म्हणाला, “मला बोलणारी लोकं खूप आवडतात. माझ्या घरात खूप सारेजण आहेत. आई, बाबा, दादा, ताई, पण साऱ्यांनाच असते खूप घाई. बोलायला माझ्याशी कुणीच नाही. एकट्याला बसून मला रडायला येई. मग मी मनाशी ठरवले. कुणा नाही सांगितले. आलो घर सोडून, जंगलात आहे बसून. इथे सगळेच माझ्याशी बोलले. वाऱ्याने म्हटली गाणी. झाडांनी सळसळ केली. पक्ष्यांनी फळे फेकली. माकडांनी मारल्या उड्या, हरणांच्या पाहिल्या गाड्या. दिवस माझा मजेत गेला. भूक नाही, तहान नाही की झोप नाही. आता घरी गेलो तर मिळेल चोप म्हणून या अंधारात बसून आहे. मी कधीपासून तुझी वाट बघतोय. आताच टिटवीने सांगितले वाघोबा फिरतायत सगळीकडे.”

मुलाची कहाणी ऐकून वाघाला त्याची दया आली. वाघाने मुलाच्या तोंडावरून शेपटी फिरवली. मुलानेही वाघाला मिठी मारली. आता वाघ मुलाचा मित्र बनला. वाघ म्हणाला “मुला, ऐक काय सांगतो तुला. इथे खूप जंगली प्राणी आहेत. ते तुला त्रास देतील. माझ्याबरोबर तू चल, तुला मी घरी सोडतो.” मुलाने केला विचार. म्हणतोय वाघ तर जाऊया घरी. आता आईची त्याला खूप आठवण झाली. मग मुलगा बसला वाघाच्या पाठीवर, वाघोबा निघाले हालत-डुलत घराकडे! वाघाच्या पाठीवर मुलगा बसला. सगळ्या प्राण्यांना मोठे नवल वाटले. हरणे, झेब्रे, माकडे बघत बसली मुलाला. राजासारखा मुलगा निघाला घराला!

थोड्याच वेळात वाघ गावात शिरला. गावाने धोक्याचा इशारा दिला. दारे-खिडक्या पटापट झाले बंद. माणसे घाबरली, मुले रडू लागली. काही “वाघ वाघ” असं ओरडू लागली. तेवढ्यात कुणीतरी ओरडले, “अरे, वाघाच्या पाठीवर विनू बसलाय, वाघच त्याला घेऊन आलाय.” सगळ्यांनी पटापटा दारे उघडली. वाघावरची विनूची स्वारी बघून घेतली साऱ्यांनी! घर जवळ येताच विनू खाली उतरला. वाघाच्या कानात काहीतरी बोलला. तसा वाघ विनूच्या आई-बाबांसमोर उभा राहिला अन् मोठ्याने डरकाळी फोडून म्हणाला, “मुलगा जंगलात गेला. तुम्ही त्याला का नाही शोधला! त्याची आहे तक्रार, त्याच्याशी कुणी नाही बोलत. कुणी नाही खेळत. मुलांच्या आवडी-निवडीचा विचार करा जरा. या पुढे त्याला सांभाळा. प्रत्येक वेळी मी नाही वाचवणार.” आई-बाबा म्हणाले, “धन्यवाद वाघोबा, ही गोष्ट आम्हाला सांगितली. विनूच्या मनातले दुःख आम्हाला समजले.” मग वाघोबा गेला जंगलात अन् विनू गेला घरात!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -