Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीचला कामाला लागूया...

चला कामाला लागूया…

अनघा निकम-मगदूम

पावसाळी ऋतू हळूहळू सरू लागलाय आणि हिवाळ्याची चाहूल लागू लागली आहे. याचाच अर्थ कोकणामध्ये ठप्प झालेले दैनंदिन कामकाज, दैनंदिन व्यवहार आता पुनश्च सुरळीत होऊ लागतील. कारण कोकणातील पावसाळा म्हणजे चार महिने मुसळधार पावसाचे असतात. त्यातही जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये तर धुवांधार पावसाचा अनुभव कोकणवासीयांना येत असतो. गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या वेळापत्रकात नियमितता नाहीये. असं असलं तरी तो कोकणाची सरासरी दर वर्षी भरून काढतो. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस पडतोच. कधी कधी दिवाळीत आणि वादळ सदृश्य परिस्थिती झाली, तर अगदी डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा पावसाच्या सरी कोसळल्याच्या नोंदी आहेत. मात्र असं असलं तरीसुद्धा पावसाचे सप्टेंबरपर्यंतचे चार महिने आता सरू लागलेत. ऑक्टोबर हिट ओसरली की, हिवाळ्याची चाहूल आपल्याला लागेल. त्यामुळेच आता पुन्हा कोकणातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागतील.

गेल्या काही वर्षांपासून कोकणातले काही प्रश्न हे ‘जैसे थे’च राहिले आहेत. त्यातीलच काही महामार्ग चौपदरीकरणाचे, जिल्हा अंतर्गत रस्त्यांचे, किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधारे असतील घाट रस्ते असतील त्यांची डागडुजी असेल, असे अनेक प्रश्न पावसाळा जवळ आला की, त्यावर चर्चा होते. त्यावर उपाय शोधले जातात, त्याच्यासाठी निधीची तरतूद केली केली जाते आणि त्याची अंमलबजावणी करेपर्यंत पावसाळा येतो आणि हे काम पुन्हा एकदा चार महिन्यांचा ब्रेक घेऊन ठप्प होऊन जातं. रत्नागिरी जिल्ह्यातच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक महिने ठप्प झालं आहे. सिंधुदुर्गातला महामार्ग चौपदरीकरणाचं काम पूर्ण होऊन त्यावरून गाड्या वेगाने धावायला सुरुवात झालीसुद्धा आहे. मात्र कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात काही भागांमध्ये चौपदरीकरणाचे काम रखडलं असल्यामुळे इकडच्या कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. त्याच वेळेला इथल्या घाट रस्त्यांचासुद्धा प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’च आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटाचा प्रश्न कधी सुटणार? हा प्रश्न वाहनचालकांबरोबरच स्थानिकांना पडला आहे. या घाट रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये काही काळ हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र कालावधी पुरेसा देऊनही म्हणावं तसं काम अपेक्षित स्वरूपात पूर्ण झालं नाही. याच गोष्टी महामार्गावरील किंवा रस्त्यावरील पुलांच्या बाबतीत आहेत. काही अपुरे आहेत, काही मोडकळीस आले आहेत. अनेक ठिकाणी डागडुजीची गरज आहे. रस्त्यांच्या बाबतीतली अवस्थासुद्धा तीच आहे. महामार्ग काय, राज्यमार्ग काय किंवा जिल्हा मार्ग काय आणि गाव रस्ते काय, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून मुसळधार पावसाचा परिणाम हा त्याचा एक भाग आहे. तरीसुद्धा त्याची दुरुस्ती रखडत रखडत परत मार्च आणि एप्रिलमध्ये करून आवश्यक तो परिणाम साधला जात नाही. त्यामुळे त्याच्या डागडुजीचं काम तत्काळ हाती घेण्याची गरज आहे.

चांगले रस्ते असणं ही केवळ एखाद्या प्रदेशाची, एखाद्या भागाची केवळ कामाचा भाग अशी गोष्ट नाहीये, तर त्याचा थेट संबंध मनुष्याच्या आरोग्यावरती होत असतो. स्त्यावरून वाहन चालवणाऱ्या लोकांना या खड्ड्यांचा होणारा त्रास आणि त्यामुळे त्यांना मणक्याचे्याहोणाऱ्या समस्या यामुळे अनेकजण गेली अनेक वर्षे बेजार झाले आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे प्रकर्षाने बघण्याची गरज निर्माण झाली. रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी शहराजवळच्या मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलं. या वर्षी त्या कामाला सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं. मात्र ठेकेदारांना अपेक्षित प्रगती या पावसाळ्यात केली नाही. यंदा पावसाचा जोर आणि लाटांचा तडाखा जरी फार मोठा बसला नाही, तरीसुद्धा मिऱ्यावासीयांना पावसाळ्यातील प्रत्येक रात्र विशेषतः पौर्णिमा-अमावस्येच्या उधाणची रात्र जागून काढली आहे. त्यामुळे मिऱ्यावरती असलेल्या या प्रस्तावित बंधाऱ्याचं काम तत्काळ हाती घेणं आता गरजेचं झालं आहे. आतापासूनच या कामाला वेग आला, तर पुढील पावसाळ्यामध्ये मिऱ्यावासीय पावसाळ्यातील प्रत्येक रात्र निर्धास्थपणे झोपू शकतील.

त्यात यंदा पाऊस जरी चांगला झाला असला तरीसुद्धा पुढील वर्षीचा येणारा उन्हाळा हा भीषण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीटंचाईच्या उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक झाले. सध्या पाऊस पडून जात असल्यामुळे अनेक ठिकाणी छोटे-मोठे ओढे, छोट्या-मोठ्या नद्या यांचे वाहते पाणी मुबलक प्रमाणात कोकणामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आतापासूनच डिसेंबरपर्यंत बंधारा मोहिमेची जर आखणी केली आणि छोटे-छोटे वनराई बंधारे बांधून वाहतं पाणी अडवलं आणि आजूबाजूच्या विहिरींमधील पाणीसाठा वाढवला, तर येणारा उन्हाळासुद्धा काहीसा सुसह्य होईल. दळण-वळण, पाणी या गोष्टी या कोकणवासीयांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आताचा काळ हा गतिमान काळ आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे हे छोटे वाटणारे प्रश्न पुढे भीषण रूप धारण करण्यापूर्वीच त्यावर तत्काळ उपाययोजना केली आणि कामाला लागलं, तर येणाऱ्या काळामध्ये इथला कोकणवासी निश्चितच सुखावह होईल हे नक्की. त्यामुळे चला कामाला लागूया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -