Friday, May 3, 2024
Homeमहामुंबईजागतिक तंबाखू विरोधी दिनी आरोग्य खात्याद्वारे जनजागृती

जागतिक तंबाखू विरोधी दिनी आरोग्य खात्याद्वारे जनजागृती

मुंबई (प्रतिनिधी) : ३१ मे रोजीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मुंबई पोलीस दलाच्या अखत्यारितील डी. एन. नगर पोलीस स्टेशन आणि वर्सोवा पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांसाठी जागरुकता सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच पश्चिम उपनगरातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ‘तंबाखू अवलंबित्व आणि त्याचे व्यवस्थापन’ यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमांमध्ये तंबाखूचे आपल्या व आपल्या आजूबाजूच्या लोकांवर होणारे दुष्परिणाम, तंबाखूमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान, तंबाखूचे अवलंबित्व, त्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन याबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. तथापि, सदर व्यसनमुक्ती केंद्राने स्वतःला केवळ वर नमूद केलेल्या मुद्द्यापुरते मर्यादित ठेवले नाही. या केंद्रात केलेला प्रत्येक प्रयत्न हा नेहमीच रुग्णांच्या हिताचा राहिला आहे आणि लोकांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करणे, हीच या केंद्राची प्रमुख संकल्पना आहे. तर ३१ मे २०२२ पासून असंसर्गजन्य रोग कक्ष, सार्वजनिक आरोग्य खाते यांच्यातर्फे ‘इंडियन डेन्टल असोसिएशन’ यांच्या समन्वयाने मुंबईतील नागरिकांकरिता मौखिक आरोग्य व कर्करोग जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने आणि उपनगरिय रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारितील व्यसनमुक्ती केंद्र हे अंधेरी (पश्चिम) परिसरात असणाऱ्या भरडावाडी प्रसूतिगृह इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर कार्यरत आहे. या केंद्रामध्ये दारू, चरस, गांजा, भांग, ब्राऊन शुगर, एम. डी. यासह तंबाखू इत्यादींसारख्या विविध घातक पदार्थांच्या व्यसनी रुग्णांवर आंतररुग्ण तसेच बाह्यरुग्ण विभागात उपचार केले जातात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -